चोरलेल्या गाड्यांना ‘पोलीस’ स्टिकर, चोरट्यांच्या क्लृप्त्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 06:17 AM2018-11-08T06:17:14+5:302018-11-08T06:17:27+5:30
मोटारसायकल चोरल्यानंतर तिला ‘पोलीस’ असल्याचा स्टिकर लावायचे आणि नंतर तीच गाडी आपल्या कोणत्याही कामासाठी वापरायची, अशी धक्कादायक माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध पथकांनी अटक केलेल्या आरोपींकडून उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे - मोटारसायकल चोरल्यानंतर तिला ‘पोलीस’ असल्याचा स्टिकर लावायचे आणि नंतर तीच गाडी आपल्या कोणत्याही कामासाठी वापरायची, अशी धक्कादायक माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध पथकांनी अटक केलेल्या आरोपींकडून उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एखाद्या अपघातामध्ये वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाल्यानंतर गाडीच्या नुकसानीचा क्लेम संबंधित वाहनधारकाने केल्यानंतर तिची संपूर्ण नुकसानभरपाई विमा कंपनीकडून दिली जाते. त्यानंतर, लिलावामध्ये
ही गाडी एखाद्या एजंटकडून खरेदी केली जाते. याच गाडीची चेसिस काढून ती चोरीच्या गाडीला लावली जाते. इंजीनचा क्रमांक ग्राइंडरने
खोडून टाकला जातो. अशा प्रकारे चोरीची गाडी रस्त्यावर आणली जाते. हसन जाफरी, शमीम अन्सारी आणि सन्नान खान या मुंब्य्रातील टोळीकडून अनेक वाहनांची चोरी उघड झाली आहे. चारचाकी वाहने चोरून नेण्यात ही टोळी माहीर असल्याचे उघड झाले आहे. सुरेंद्र सोंडकर (भिवंडी), सागर पुवरा (भिवंडी) आणि साकीब अन्सारी (पडघा) या अन्य एका दुचाकी चोरणाऱ्या टोळीलाही अशाच प्रकारे सापळा लावून गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता कक्षाच्या पथकाने अटक केली आहे. साकीब हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यानेही आतापर्यंत अनेक गाड्या चोरल्याचे उघड झाले आहे. साकीबसारख्या अनेक छोट्या टोळ्यांना जेरबंद करण्यात आले असून आतापर्यंत १५६ आरोपींना अटक केली आहे.
चोरीच्या वाहनांना ‘पोलीस’चे स्टिकर लावल्यानंतर तेच वाहन स्वत:च्या कामासाठी हे चोरटे वापरत होते. अशाच एका टोळीच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. आणखीही वाहनचोरांचा शोध घेण्यात येत आहे.
- प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग,
ठाणे शहर