PSI च्या अंगठ्याला दारुड्याने घेतला चावा; भाभा रुग्णालयाच्या डॉक्टरनाही शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 11:34 AM2023-05-04T11:34:53+5:302023-05-04T11:35:07+5:30
तक्रारदार सचिन ढवळे (४५) हे वांद्रे पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक आहेत.
मुंबई : पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वांद्रे येथे वाद घालणाऱ्या दारुड्याला आवरणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगठ्याचा दारुड्याने कडकडून चावा घेतला. अंगठ्याला गंभीर दुखापत झाली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्याने भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनाही शिवीगाळ केल्याचे समजते.
तक्रारदार सचिन ढवळे (४५) हे वांद्रे पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिस ठाणे अंमलदार कक्षात असताना दत्ताराम मोरे (७०) तेथे आले व त्यांनी दारूच्या नशेत असलेला आरोपी कैलास भोकसे (५०) याने मारहाण केल्याची तक्रार दिली. कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरीक्षक पोकळे यांनी त्यांची तक्रार ऐकून घेत असताना भोकसे तेथे आला आणि त्याने आरडाओरडा केला.
मोरे यांनी अन्य दोघांसोबत मिळून हाताने आणि काठीने मला मारहाण केली, असे भोकसे याने पोलिसांना सांगितले. तसेच माझ्या विरोधात खोटी तक्रार का दाखल करून घेतली, असा जाबही विचारला. त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता, त्यामुळे उपनिरीक्षक पोकळे यांनी भोकसे याला शांत राहायला सांगत पोलिस नाईक मोरे यांच्यासोबत भाभा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. भोकसे शिवीगाळ करत असल्याने ढवळेंनी त्याला रायटर कक्षात बसविण्याचा प्रयत्न केला. आक्रमक होत त्याने उपनिरीक्षक ढवळेंना शिवीगाळ करत डाव्या हाताच्या अंगठ्याचा कडकडून चावा घेतला.
भोकसे विरोधात गुन्हा दाखल
पोलिस उपनिरीक्षक ढवळेंना शिवीगाळ करत त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा कडकडून चावा घेतला. यात ढवळे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानुसार नशेत असलेल्या भोकसेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी वाहनचालक आहे.