एका दिवसातच हरवलेल्या मुलाचे पालक शोधण्यात पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 10:02 PM2021-12-02T22:02:11+5:302021-12-02T22:03:25+5:30
Ambernath : कन्हैया विनोद कुमार वर्मा असे या 3 वर्षीय हरवलेल्या मुलाचे नाव आहे. तो महालक्ष्मी नगर परिसरात वास्तव्याला आहे.
अंबरनाथ: अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर परिसरात एक तीन वर्षाचा मुलगा नागरिकांना सापडला. मात्र तो मुलगा आपलं घर दाखवू न शकल्याने त्याच्या पालकांना शोधण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर समाज माध्यमांवर या मुलाचा फोटो पसरताच या मुलाचे आई-वडील सापडले.
कन्हैया विनोद कुमार वर्मा असे या 3 वर्षीय हरवलेल्या मुलाचे नाव आहे. तो महालक्ष्मी नगर परिसरात वास्तव्याला आहे. सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास कन्हैया वर्मा हा घराबाहेर खेळता-खेळता दिशाभूल झाला आणि घरापासून दुर निघून गेला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस कन्हैयाला पोलीस चौकीत घेऊन आले आणि तसंच त्याला विचारपूस केली असता त्याला काहीच माहिती नसल्यामुळे पोलिसांनी बीट मार्शल आणि एका महिला पोलीस कर्मचारी यांना या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी रवाना केले. मात्र दिवसभर शोधूनही त्याचे नातेवाईक सापडू शकले नाही.
अखेर पोलिसांनी कन्हैया याचा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल केला आणि ज्योती डोंगरे ही महिला या मुलाच्या परिचयातली असल्याने तिने त्याच्या आई वडिलांना कळवले. कन्हैय्या याचे आई-वडील कामावर गेले असताना कन्हैया हा त्याच्या सहा वर्षीय बहिणी सोबत घरात एकटाच होता. संध्याकाळी आई वडील घरी परत आल्यावर कन्हैया बेपत्ता झाल्याच त्यांना ज्योती डोंगरे यांनी सांगितले. त्यानंतर ते शिवाजी नगर पोलिस ठाण्यात पोचले असता कन्हैय्याला त्याच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आले.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मुलगा काही सांगू शकत नसल्याने त्याचा पालकांचा शोध घेणे अवघड वाटत होते. मात्र अंबरनाथकरांनी या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून एका दिवसातच त्याच्या पालकांना शोधण्यात सहकार्य केले.
- मधुकर भोगे , वरीष्ठ पोलीस निरीक्षक