रिक्षात गहाळ झालेले दागिने, रक्कम मिळवून देण्यात पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 02:18 PM2024-04-20T14:18:33+5:302024-04-20T14:19:23+5:30
महिला प्रवाशाच्या चेहऱ्यावर पेल्हार पोलिसांनी फुलवले हासू
- मंगेश कराळे
नालासोपारा : रिक्षात प्रवास करताना गहाळ झालेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम परत मिळवून देण्यात पेल्हारच्या पोलिसांना यश मिळाले आहे. सोन्याचे दागिने, रोख रक्कम परत मिळाल्याने पोलिसांमुळे महिला प्रवाशाच्या चेहऱ्यावर हासू फुलले होते.
धानिवबाग येथे राहणाऱ्या नाजली अन्सारी (२४) या १७ एप्रिलला दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी धानिवबाग ते नालासोपारा रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षातून प्रवासा दरम्यान त्यांची बॅग रिक्षात विसरल्याचे घरी आल्यावर लक्षात आले. त्या बॅगमध्ये १ तोळे सोन्याची चेन, २ ग्रॅमचे कानातील सोन्याचे झुमके, ५ हजार रुपयांची रोख रक्कम असे एकूण १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल गहाळ झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पेल्हार पोलिसांना घटनेबाबत माहिती देऊन तक्रार दिली. त्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनोळखी रिक्षा व त्यावरील चालकाचा शोध घेण्यासाठी पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना सूचना देऊन आदेश केला.
गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी घटना स्थळाचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका रिक्षामधून नाजली अन्सारी या उतरताना दिसल्या. त्या रिक्षाचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतल्यावर ती रिक्षा सोपारा फाटा ते नालासोपारा रेल्वे स्थानक अशी प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर रिक्षाचा शोध घेतल्यावर निष्पन्न झाली. त्या रिक्षावरील चालकाला बॅग बाबत विचारणा केल्यावर मौल्यवान वस्तू असलेली बॅग पोलिसांना आणून दिली. पेल्हार पोलिसांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम असलेली बॅग नाजली यांना परत केली.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (प्रशासक) शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, निखिल मंडलिक, संजय मासाळ, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी केली आहे.