तीन लाखांच्या लाचेप्रकरणी हवालदार बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 05:12 PM2019-08-16T17:12:39+5:302019-08-16T17:13:39+5:30
मृत्युच्या दाखल्या संदर्भात दिलेला रिपोर्ट बदलण्याकरिता पोलीस हवालदाराने तीन लाख रुपयांची लाच स्वीकारली.
पुणे : मंचर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृत्युच्या दाखल्या संदर्भात दिलेला रिपोर्ट बदलण्याकरिता एका पोलीस हवालदाराने तीन लाख रुपयांची लाच स्वीकारली. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी संबंधित हवालदाराला सेवेतून बडतर्फ केले आहे.
पोलीस हवालदार राजेंद्र गोपाळ आर्य असे कारवाई केलेल्याचे नाव आहे. राजेंद्र हा सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात नेमणुकीस होता. मयत प्रियंका शिंदे यांच्या मृत्युचा अहवाल मंचर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी यापूर्वी दिला होता. त्यात बदल करण्याकरिता आर्य याने तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती आणि लाच स्वीकारली. त्यानुसार राजेंद्र यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्याला अटक केली. पोलीस अधीक्षक पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राजेंद्र याला सेवेतून बडतर्फ केले आहे.