नागपूर शहर वाहतूक शाखेत मजनूगिरी करणारा पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:21 AM2020-01-11T00:21:14+5:302020-01-11T00:21:55+5:30
मोबाईलवर आपत्तीजनक मेसेज पाठवून बदनामी केल्यामुळे स्वत:च्या विभागातील एका महिला पोलिसाकडून कानशेकणी झालेल्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईलवर आपत्तीजनक मेसेज पाठवून बदनामी केल्यामुळे स्वत:च्या विभागातील एका महिला पोलिसाकडून कानशेकणी झालेल्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले. शुक्रवारी या कारवाईची माहिती उघड झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली.
नंदू तायडे नामक हा पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेच्या इंदोरा कार्यालयात कार्यरत होता. सदर महिला पोलीस वाहतूक शाखेच्या जरीपटका विभागात कार्यरत आहे. तेथेच नंदू काम करतो. महिला आणि नंदूमध्ये अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. त्याची कल्पना सोबत काम करणाऱ्या अनेक पोलिसांनाही होती. मात्र, कुणीच त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढतच गेला. दरम्यान, सोमवारी ६ जानेवारीच्या रात्री ८ च्या सुमारास महिला तिच्या पतीसह वाहतूक पोलिसांच्या इंदोरा कार्यालयात पोहचली. ‘तू मला वारंवार त्रास का देतो, अशी तिने नंदूला विचारणा केली तर तिच्या पतीने नंदूला पत्नीची विनाकारण बदनामी कशाला करतो’, असे विचारत पती-पत्नीने नंदूची कानशेकणी केली. वर्दळीच्या ठिकाणी इंदोरा चौकातील कार्यालयात हा प्रकार घडल्याने आजूबाजूच्यांनी तेथे मोठी गर्दी केली होती. वृत्तपत्रातून दुसऱ्या दिवशी त्याचा बोभाटा झाला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करून घेतली. घटनेनंतर दोन्हीकडून तक्रार देण्यास इन्कार करण्यात आल्याने प्रकरणावर पडदा पडण्याची चर्चा सुरू झाली असतानाच वरिष्ठांनी मात्र त्याची गंभीर दखल घेतली. गुरुवारी रात्री नंदूच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. विशेष म्हणजे, अशीच काही प्रकरणे वर्षभरात शहर पोलीस दलात घडली. मात्र, विनयभंगाचा आरोप अन् बदलीची जुजबी शिक्षा मिळाल्याने मजनुगिरी करणाऱ्या पोलिसांवर फरक पडला नाही. या कारवाईमुळे मात्र मजनूगिरी करणारांना चाप बसण्याची आशा व्यक्त केली जात आहे.