२७ लाखांच्या बोगस कर्जवाटपातील ‘त्या’ लाभार्थींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 05:49 AM2023-07-14T05:49:03+5:302023-07-14T05:49:08+5:30
पारोळा बोगस कर्जवाटप प्रकरण : गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता
पारोळा : अहमदाबाद येथील नम्रा फायनान्स कंपनीच्या पारोळा शाखेत बोगस कर्ज वाटप करून २७ लाखांचा अपहार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. या प्रकरणी चारही आरोपी पसार असून त्यांच्या शोधार्थ पोलिस पथक पाठवण्यात आले आहे. या पथकात पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, सुधीर चौधरी, अभिजित पाटील आदींचा समावेश आहे.
पारोळा शहरातील महावीरनगर येथे अहमदाबाद येथील नम्रा फायनान्सची शाखा असून, सन २०१६ पासून या शाखेचे काम सुरळीत होते. विविध प्रकारच्या कर्ज योजनांचा लाभ या शाखेतून दिला जात होता. मात्र, सप्टेंबर २०२१ मध्ये या शाखेत कार्यरत असलेले रमेश महाजन (रा. जवखेडा, ता. एरंडोल) यांची शाखा व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली. याचवेळी अमोल पाटील (रा. मठगव्हाण, ता. अमळनेर), अक्षय वसंत महाजन (रा. जवखेडा, ता. एरंडोल) व तुषार पवार (रा. मठगव्हाण, ता. अमळनेर) यांनी संगनमत करून अपहार केला.
आधार कार्डांमध्ये फेरफार
चौघा आरोपींनी वेगवेगळ्या लोकांचे आधार कार्ड जमा केले. सर्व आधार कार्ड व इतर पुरावे कॉम्प्युटरद्वारे एडिटिंग केले. कार्डवर नाव बरोबर तर पत्ता चुकीचा अशा वेगवेगळ्या प्रकारे एडिटिंग केले व ते कर्जप्रणालीत टाकले. तब्बल ६९ लोकांच्या नावे कर्जाची प्रकरणे टाकली.
मुद्रा योजनेचा दुसऱ्यांचा लाभ लाटला
कोविड काळामध्ये केंद्र सरकारतर्फे गरजू, छोट्या व्यावसायिकांना मुद्रा लोन वितरण करण्याची योजना होती. त्या योजनेच्या आधारावर या चारही जणांनी ६९ लोकांना मुद्रा लोन योजनेत कर्ज दिले. एकूण २७ लाख ३३ हजार रुपये कर्ज वितरण केले. सुरुवातीला प्रत्येक बनावट लाभार्थ्यांच्या नावावर दोन ते चार हप्ते या चौघा आरोपींनी स्वतःच्या पैशांमधून भरले होते. काही दिवसांनंतर एकेकाने कंपनीचा राजीनामा दिला. ऑडिटच्या दरम्यान अपहाराचा प्रकार पुढे आला. तोपर्यंत हे सर्व जण राजीनामा देऊन पसार झाले होते.