सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस उभारणार हत्येचा देखावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 07:21 AM2021-01-05T07:21:02+5:302021-01-05T07:21:25+5:30
Crime News : जान्हवी कुकरेजा हत्याप्रकरण : तपास अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खारमधील विद्यार्थिनी जान्हवी कुकरेजा (वय १९) हिच्या हत्येच्या रात्री नेमकं काय काय घडलं? हे जाणून घेण्याच्या उद्देशाने खार पोलीस हत्येचा देखावा उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सीसीटीव्हीचे अपुरे चित्रण आणि सतत बदलणाऱ्या जबाबाच्या आधारे ते करणे तपास अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
जान्हवीची हत्या तिचा प्रियकर श्री जोगधनकर आणि दिया पडळकर या दोघांनी केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. मात्र, त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरुवात केल्यापासून नशेत असलेल्या या दोघांना काहीच आठवत नसल्याचे उत्तर ते देत आहेत. सध्या या दोघांना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दुसरीकडे गुन्हा घडला त्या रात्री काय घडले याचा अंदाज घेण्यासाठी पोलीस हत्येचा देखावा पुन्हा उभारण्याची तयारी करत आहेत. मुख्य म्हणजे मध्यरात्री काय घडले याचा शोध घेताना त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अर्धवट चित्रण आणि बदलणाऱ्या जबाबाच्या आधारे त्यांना हे करावे लागणार असून, ते त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या खांद्यावर या सगळ्याची खरी धुरा असणार आहे.
इतकी मारहाण होताना दुसऱ्या मजल्यावर कोणालाच जान्हवीच्या किंचाळण्याचा किंवा मारेकऱ्यांचा आवाज कसा आला नाही यादृष्टीने देखील तपास सुरू आहे. जान्हवी तिच्या दोन मित्रांशी फोनवर बोलल्याचीही माहिती समोर आली असून, त्या दोघांचाही जबाब नोंदविला जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.सीसीटीव्हीचे अपुरे चित्रण आणि सतत बदलणाऱ्या जबाबाच्या आधारे ते करणे तपास अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
जबाबात तफावत
n ३१ डिसेंबरच्या रात्री एकूण १२ जण पार्टीत सहभागी झाले होते. त्यापैकी सध्या पोलिसांनी दोन अटक आरोपींसह अन्य नऊ लोकांची चौकशी करत प्राथमिक जबाब नोंदविले आहेत. मात्र, त्या रात्री नशेत असल्याने संशयितांसह सर्वांच्याच जबाबात तफावत आढळत आहे.