पोलिसाचा मित्रच निघाला चोर; डोंगरी पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 02:52 AM2020-01-13T02:52:31+5:302020-01-13T02:52:42+5:30
तो मोबाइल सुरू करता त्यातील फोन पे अॅप गायब असल्याचे लक्षात आले
मुंबई : गावी जाण्यापूर्वीच्या खरेदीदरम्यान मित्रानेच पोलिसाचा आधी मोबाइल चोरी केला. त्यानंतर, मोबाइलमधील फोन पे अॅपवरून २ लाखांवर हात साफ केल्याची घटना डोंगरीत घडली आहे. या प्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
चिंचपोकळी येथील रहिवासी असलेले वसंत माळी (४४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते भारतीय थलसेनेमधून २०१०मध्ये निवृत्त असून, सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वैयक्तिक वापराकरिता त्यांच्या मोबाइलमध्ये व्यवहारासाठी फोन पे अॅप डाऊनलोड केले आहे. १३ नोव्हेंबर रोजी मंत्रालय येथील ड्युटी उरकून, ३ दिवस सुट्टी असल्याने गावी जाण्यास निघाले. जाण्यापूर्वी खरेदी करण्यास ते सॅण्डहर्स्ट रोडच्या दिशेने निघाले. तेव्हा त्यांचा मित्र शिवानंद जगदाळे त्यांच्यासोबत होता. डोंगरी परिसरात येताच त्यांना मोबाइल गायब असल्याचे लक्षात आले. पण गाडी पकडण्याच्या नादात त्यांनी पोलिसांत तक्रार केली नाही. गाडी पकडल्यानंतर शेजारील व्यक्तीच्या मोबाइलवरून त्यांनी कॉल केले. मात्र मोबाइल नॉट रिचेबल होता. त्यानंतर मध्यरात्री ८ ते १० वेळा कॉल केल्यावर फोनची रिंग वाजली. त्यानंतर रात्री उशिराने कॉल उचलला. तेव्हा, समोरची व्यक्ती जगदाळे असल्याचे लक्षात आले. त्याने उडवाउडवीची उत्तरे देत फोन बंद केला. १७ नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबई गाठताच त्यांच्या रूम पार्टनरने जगदाळे १६ नोव्हेंबर रोजी मोबाइल देऊन गेल्याचे सांगितले.
तो मोबाइल सुरू करता त्यातील फोन पे अॅप गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी ते अॅप पुन्हा डाऊनलोड केले, तेव्हा पैसे डेबिट झाल्याचे लक्षात आले. १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान त्यांच्या खात्यातून २ लाख १० हजार रुपये काढल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत अर्ज केल्यानंतर ९ जानेवारी रोजी डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संशयित पसार
या प्रकरणातील संशयित व्यक्ती पसार असून त्याचा व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी दिली आहे.