पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन?

By प्रविण मरगळे | Published: October 29, 2020 10:20 AM2020-10-29T10:20:05+5:302020-10-29T10:25:32+5:30

Gautam Pashankar Missing News: वडील गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यमागे राजकीय व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या राजकीय व्यक्तीची माहिती कपिल यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिली आहे.

Political connection behind the disappearance of famous Pune businessman Gautam Pashankar? | पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन?

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन?

Next
ठळक मुद्देगेल्या ८ दिवसांपासून पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता, अद्यापही शोध नाहीगौतम पाषाणकर यांचे अपहरण झाल्याचा संशय, राजकीय कनेक्शन असलेल्या व्यक्तीवर आरोप गौतम पाषाणकर यांच्या मुलाने पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली

पुणे – शहरातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर मागील ८ दिवसांपासून बेपत्ता असून अद्यापही त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. गौतम पाषाणकर यांचे अपहरण झाल्याची शक्यता त्यांचे चिरंजीव कपिल पाषाणकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण असल्याचंही बोललं जात आहे. वडिलांच्या अपहरणामागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप मुलगा कपिलने केला आहे.

याबाबत कपिल पाषाणकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी वडील गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यमागे राजकीय व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या राजकीय व्यक्तीची माहिती कपिल यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना कपिल पाषाणकर म्हणाले की, स्वत: ती राजकीय व्यक्ती नव्हे तर त्याच्याशी संबंधित व्यक्ती या प्रकरणात आहे. वडिलांनी ज्या काही आर्थिक अडचणी होत्या त्याची चौकशी केली, तेव्हा मागील २-३ महिन्यापासून नेमकं काय घडलं होतं? वडिलांवर तणाव का होता? त्यांच्या जवळच्या माणसांकडून माहिती घेतली असता एक व्यक्ती सतत वडिलांना पैशासाठी धमकावत असल्याचं कळालं, त्याने वडिलांवर केसही केली होती असं कपिल पाषाणकर यांनी सांगितले.

तसेच पुणे पोलिसांच्या तपासावर समाधानी आहे. यात कुठेही राजकीय दबाव येऊ नये, पोलीस त्यांच्या तऱ्हेने गौतम पाषाणकर यांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. यासाठी मी भेट घेतली असंही कपिल पाषाणकर म्हणाले.

८ दिवसांपासून बेपत्ता

पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर हे बुधवारी (दि. २१) सायंकाळपासून बेपत्ता झाले आहेत. यासंदर्भात त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र या घटनेने शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट आढळल्याने एकच खळबळ उडाली. सुसाईड नोटमध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं गौतम यांनी लिहिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम यांनी बुधवारी दुपारी लोणी काळभोर येथे भेट दिली होती. त्यानंतर ते दुपारी ४ वाजताच्या सुमारास जंगली महाराज रोडवरील कार्यालयात गेले होते. त्यांच्या ड्रायव्हरने अनेकदा कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. यानंतर ड्राइव्हरने गौतम यांचा  मुलगा कपिल याच्याशी संपर्क साधला, अशी माहिती पोलिसांनी पुढे दिली. कुटुंबीय शोध घेण्यात अपयशी ठरल्यानंतर कपिलने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.

Read in English

Web Title: Political connection behind the disappearance of famous Pune businessman Gautam Pashankar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.