पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पहिला गुन्हा दाखल होणार; चुलत आजी शांताताई राठोड नोंदवतायेत जबाब
By पूनम अपराज | Published: February 28, 2021 04:08 PM2021-02-28T16:08:09+5:302021-02-28T16:10:14+5:30
Pooja Chavan Death Case : आता त्यांचा जबाब नोंदवण्याचे काम पोलीस करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिली.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात राजकारणात मोठं वादंग निर्माण झाला आहे. मात्र, पूजा प्रकरणात वानवडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद झाली असून इतके आरोप केलं जात असून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या घटनेला २१ दिवस झाल्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. आता या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल होणार आहे. पूजा राठोडची चुलत आजी शांताताई राठोड आज गुन्हा दाखल करण्यासाठी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. आता त्यांचा जबाब नोंदवण्याचे काम पोलीस करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई हा देखील शांताताई राठोड यांच्यासोबत वानवडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मात्र, लगड यांनी तक्रार देण्यास सांगितली. त्यानंतर पूजाची चुलत आजी शांताताई राठोड यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरु असल्याची माहिती तृप्ती देसाई यांनी सांगितली. शांताताई राठोड या तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलीस ठाण्यात गेल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी पूजाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मीडियाशी बोलताना सांगितले.
एबीपी माझाकडे बोलताना शांताताई म्हणाल्या की, पोलिसांचं म्हणणं आहे पूजाच्या मृत्यूला १८ दिवस झालेले आहेत. पूजाच्या मृत्यू प्रकरणात कुणीही नातेवाईक गुन्हा दाखल करायला आलेले नाहीत. म्हणून मी नातेवाईक या नात्याने आम्ही वानवडी पोलीस ठाण्यात जाणार आहोत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी कुणीही आरोपी असो अरुण राठोड, विलास चव्हाण, असो किंवा मंत्री संजय राठोड असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोवर मी पुण्यातून बाहेर जाणार नाही, असं पूजाची आजी शांताबाई यांनी ठाम निश्चय केला आहे. व्यवस्थित चौकशी झाली नसेल तर मी पोलिसांविरोधात देखील गुन्हा दाखल करणार आहे, असेही शांताताई राठोड यांनी सांगितले.