Sameer Wankhede: पूजा दादलानीने सर्वांनाच 'अडकवले'; समीर वानखेडेंच्या वसुलीची चौकशी थांबली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 01:20 PM2021-11-16T13:20:24+5:302021-11-16T13:21:16+5:30
Pooja Dadlani, Sameer Wankhede Extortion Case: मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता तिसरा समन्स पाठविण्यात येणार आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटींची मागणी केली होती. हा सौदा 18 कोटींवर झाला आणि त्यातील 8 कोटी रुपये हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गौप्यस्फोट साईल नावाच्या साक्षीदाराने केला आणि ड्रग्ज प्रकरणाला कलाटणी मिळाली. आर्यनला ताब्यात घेतल्यापासून ते कोर्टात जामिन मिळविण्याच्या प्रयत्नांमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीची मोठी भूमिका होती. तीच या खंडणीच्या प्रकरणी मुख्य साक्षीदार ठरू शकते. परंतू, पूजाच्या चौकशीला सामोरे न जाण्यामुळे एनसीबी, मुंबई पोलीस आणि सारेच अडकले आहेत. (Aryan khan Drug case)
पूजा दादलानीची कार साईलने सांगितल्याप्रमाणे किरण गोसावी आणि सॅम डिसूझाला भेटण्यासाठी त्या रात्री गेली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे, या तिघांची भेट झाल्याचे स्पष्ट होत आहे. सुरवातीला 50 लाखांची रक्कम स्वीकारल्याचे सॅमने केलेल्या खुलाशात समोर आले आहे. यामुळे पूजा या खंडणी प्रकरणात मोठा पुरावा आहे.
NCB च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोनदा समन्स पाठविण्यात आले आहेत. परंतू पूजाने दुसरा समन्स आल्यावर वेळ वाढवून मागितला होता. तरीही ती हजर होत नसल्याने एसआयटी आता तिसरी नोटीस पाठविणार आहे. पूजाने प्रकृतीचे कारण दिले होते.
दुसऱ्या समन्सची मुदत संपली तरी पूजा चौकशीला आली नाही. जबाब न नोंदविल्यामुळे समीर वानखेडेंच्या खंडणी प्रकरणाची चौकशी करता येत नाहीय. प्रभाकर साईलने के पी गोसावी, सॅम डिसूझा आणि समीर वानखेडेंवर खंडणी उकळत असल्याचे आरोप केले आहेत. याची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे शाहरुख खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात या खंडणीच्या प्रकरणी आपला काहीच संबंध नसल्याचे म्हटले होते. परंतू सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे खुलासे काही वेगळेच सांगत आहेत.