पूनम अर्बन क्रेडिट को- ऑपरेटीव्ह सोसायटी घोटाळा : आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:39 AM2020-03-13T00:39:17+5:302020-03-13T00:40:46+5:30
शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका देणाऱ्या पूनम अर्बन क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या घोटाळा प्रकरणी पुन्हा एका एजंटला बुधवारी अटक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका देणाऱ्या पूनम अर्बन क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या घोटाळा प्रकरणी पुन्हा एका एजंटला बुधवारी अटक करण्यात आली आहे. प्रसाद प्रभाकर अग्निहोत्री असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने त्याचा १६ मार्चपर्यंत पीसीआर मिळवला आहे.
पूनम अर्बन सोसायटीचे पदाधिकारी आणि एजंट यांनी मोठ्या व्याजदराचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना या सोसायटीत रक्कम गुंतवायला भाग पाडले. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी सोसायटीत जमा झाल्याने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे, बनावट कर्ज प्रकरणे तयार करून कोट्यवधींचे कर्ज वाटले.
आरोपी प्रसाद अग्निहोत्री हा सोसायटीचा एजंट म्हणून काम करायचा त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या व्यक्तींना उभे करून दोन कोटींचे कर्ज हडपले. ही रोकड आरोपीने शेअर बाजारात गुंतविली. मात्र, बाजार गडगडल्याने रक्कम बुडाली. असाच प्रकार अनेक कर्ज प्रकरणात झाला. सोसायटीचे कर्ज बुडविण्याचा आरोपींचा हेतू होता. त्यामुळे कर्जाची परतफेड करण्याची तसदी कुणी घेतली नाही. परिणामी सोसायटी डबघाईस आली. तिकडे नियोजित मुदतीनंतर ठेवीदार आपली रक्कम परत मिळविण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळले जात असल्याने गोंधळ उडाला. आरोपी पदाधिकारी ठेवीदारांवरच दडपण आणण्याचे तंत्र अवलंबिल्यामुळे प्रकरण पोलिसांकडे गेले. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे या घोटाळळ्याची चौकशी सोपविण्यात आली. चौकशीत आरोपी पदाधिकारी-एजंटस्नी हा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्हे शाखेने पीडितांच्यावतीने हर्षवर्धन श्रावणजी झंझाड यांची तक्रार नोंदवून घेतली. त्यावरून एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून ही सहावी अटक आहे.
अनेकांची आयुष्यभरांची पुंजी गिळंकृत
सोसायटीचे पदाधिकारी, एजंट यांनी छोटे व्यवसाय करणारे, हातठेलेवाले सेवानिवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक व्याज देण्याची बतावणी केली होती. त्यांच्या भूलथापांना बळी पडून अनेकांनी स्वत:च्या आयुष्यभराची पुंजी सोसायटीत गुंतवली. आरोपींनी ती गिळंकृत गेल्यामुळे पीडित मंडळी कमालीची अस्वस्थ झाली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मीना जगताप करीत आहेत. या संबंधाने कुणाला माहिती द्यायची असेल किंवा तक्रारी करायच्या असेल तर त्यांनी गुन्हे शाखेत संपर्क करण्याचेही आवाहनही त्यांनी केले आहे.