पोर्ट ट्रस्टच्या चुकीने पेन्शन खात्यात गेली तिप्पट रक्कम, २२ लाख पाहून निवृत्त कामगार झाला नॉट रिचेबल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 07:22 AM2021-08-07T07:22:13+5:302021-08-07T07:23:04+5:30
pension: निवृत्तीनंतर हक्काच्या पेन्शनसाठी झगडावे लागण्याच्या घटना घडत असताना पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे निवृत्त कामगाराच्या बँक खात्यात ७ लाख रुपयांऐवजी पेन्शनची तिप्पट रक्कम गेली.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : निवृत्तीनंतर हक्काच्या पेन्शनसाठी झगडावे लागण्याच्या घटना घडत असताना पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे निवृत्त कामगाराच्या बँक खात्यात ७ लाख रुपयांऐवजी पेन्शनची तिप्पट रक्कम गेली. ही बाब लक्षात येईपर्यंत कामगाराने त्या रकमेची गुंतवणूक केली. सध्या ही रक्कम परत मिळविण्यासाठी पोर्ट ट्रस्टला पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजविण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या लेखा विभागातील पेन्शन शाखेत कार्यरत असलेले असिस्टंट सुपरिंटेंडंट (पेन्शन शाखा) विजय दत्तात्रय निकम
(५७) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन, ग्रॅच्युइटी तसेच इतर लाभांबाबतचा लेखाजोखा तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने रक्कम अदा करण्याची जबाबदारी निकम यांच्यावर आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये किनारा कामगार या पदावर काम करणारे वांद्रे येथील प्रकाश दामोदर पाटील हे गेल्या वर्षी
१ जून रोजी सेवानिवृत झाले. त्यांना सेवानिवृत्तीची २२ लाख ३७ हजार ५८१ इतकी रक्कम देणे होते. त्यापैकी गेल्यावर्षी जुलै ते नोव्हेंबरदरम्यान त्यांना १४ लाख ४४ हजार २७५ रुपये देण्यात आले होते. पुढे ७ लाख ९३ हजार ३०६ रुपये पेन्शन विभागातर्फे देणे बाकी होते. मात्र, चुकून त्यांच्या खात्यात २२ लाख ३७ हजार ५८१ इतकी रक्कम २७ नोव्हेंबर रोजी जमा करण्यात आली.
ही बाब लक्षात येताच यात पाटील यांना अतिरिक्त १४ लाख ४४ हजार २७५ रुपये परत करण्याबाबत १५ जानेवारी रोजी पत्राद्वारे कळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत पाटील यांनी या रकमेचा वापर केला होता. या पत्रानंतर पाटील यांनी रक्कम परत करण्यासाठी मुदत मागितली. मात्र, त्यानंतर वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी कॉल घेणेही बंद केले. अखेर पोर्ट ट्रस्टने गुरुवारी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात सुरुवातीला नोटीस धाडून, त्यांना बोलाविण्यात येईल, असे एमआरए मार्ग पोलिसांनी सांगितले.