अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आज भारतात आणण्याची शक्यता; सेनेगलमध्ये अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 09:43 AM2020-02-23T09:43:16+5:302020-02-23T09:45:14+5:30
तब्बल 200 खंडणीच्या गुन्ह्यांचा आरोप असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पश्चिम ऑफ्रिकेच्या सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे.
सेनेगल : तब्बल 200 खंडणीच्या गुन्ह्यांचा आरोप असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पश्चिम ऑफ्रिकेच्या सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. रॉ अधिकारी आणि कर्नाटकपोलिस सेनेगलमध्ये असून कोणत्याही क्षणी त्याचे प्रत्यार्पण केले जाण्याची शक्यता आहे. तर सूत्रांनी सांगितले की, पुजारीला विमानात बसविण्यात आले आहे.
रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याला आजच भारतात आणण्यात येईल. मात्र, पुजारीला कर्नाटकपोलिसांच्याच ताब्यात देण्यात येणार आहे. यामुळे मुंबई पोलिसांना रवी पुजारीची कोठडी मिळविण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
रवी पुजारी सेनेगलमध्ये अँटोनी फर्नांडीस या नावाच्या पासपोर्टवर सेनेगलमध्ये राहत होता. हा पासपोर्ट 10 जुलै 2013 देण्यात आला होता. याची मुदत 8 जुलै 2023 पर्यंत आहे. पासपोर्टनुसार तो एक व्यावसायिक एजंट आहे. याचा अर्थ असा की तो एक व्यापारी म्हणून ओळखला जात होता. सेनेगल, बुर्किना फासो आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये 'नमस्ते इंडिया' नावाच्या रेस्टॉरंट्सची साखळी चालवित असल्याचे भासविले जात होते.
गेल्या वर्षी जूनमध्ये सेनेगल कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी फरार झाला होता. त्याला 21 जानेवारी 2019 रोजी सेनेगल येथे भारतीय एजन्सीकडून आलेल्या इनपुटवरून अटक करण्यात आली होती. त्याने भारतात उद्योजक, सेलिब्रेटी अशांकडून खंडणी मागितल्याचे जवळपास 200 हून अधिक गुन्हे नोंद आहेत. इंटरपोलनेही त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती.