मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; पोलिसांच्या सुट्ट्या केल्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 08:27 PM2021-12-30T20:27:13+5:302021-12-30T20:58:25+5:30
Terror Attack Possibility : मुंबई पोलिसांच्या उद्या म्हणजेच ३१ डिसेंबरची साप्ताहिक आणि सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई - सध्या मुंबईसह राज्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने नववर्षाचे सेलिब्रेशन घरीच करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. तसेच कलम १४४ लागू असल्याने पार्ट्यांवर एकप्रकारे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या नववर्षाच्या जल्लोषाला दहशतवादी गालबोट लावण्याची शक्यता आहे. नव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या माहितीमुळे मुंबई पोलीस सावध झाले असून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या उद्या म्हणजेच ३१ डिसेंबरची साप्ताहिक आणि सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मुंबईवर उद्या दहशदवादी हल्ला होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. म्हणूनच सतर्कता म्हणून मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. तसेच मुंबई पोलिसांची उद्याची सुट्टी रद्द केल्या आहेत. मुंबईतील महत्वाचे स्थानकं असलेल्या दादर, वांद्रे, चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर कडक पोलीस पहारा तैनात करण्यात येणार आहे. नववर्षाच्या जल्लोषाला गालबोट लागू नये म्हणून ३ हजारहून अधिक रेल्वे पोलीस आणि अधिकारी तैनात केले जातील, अशी माहिती मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे.
All police holidays & weekly holidays have been cancelled tomorrow and every policeman posted in Mumbai will be on duty. Information was received that Khalistani elements could carry out terrorist attacks in the city, after which the Mumbai Police has been on alert: Mumbai Police
— ANI (@ANI) December 30, 2021