पोस्टमास्तरने घातला दोन कोटींचा गंडा; सीबीआयकडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 06:01 AM2022-07-23T06:01:31+5:302022-07-23T06:02:59+5:30
पोस्टमास्तरने २०२० ते २०२२ अशा दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल २ कोटी ४५ लाख रुपयांची अफरातफर केल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोस्टात रोखीने होणाऱ्या व्यवहारांची संगणक प्रणालीवर बनावट नोंद करत आणि प्रत्यक्षात ते पैसे सरकारी तिजोरीत न भरता वैयक्तिक वापरासाठी वापरणाऱ्या उप-पोस्टमास्तरवर सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. या उप-पोस्टमास्तरने २०२० ते २०२२ अशा दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल २ कोटी ४५ लाख रुपयांची अफरातफर केल्याचे उघडकीस आले आहे. हैदराबादनजीकच्या कोडंगुल येथील ही घटना आहे.
याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, कोडंगुल पोस्ट ऑफिसमधे उप-पोस्टमास्तर पदावर कार्यरत असलेल्या के. लक्ष्मीनाथ या व्यक्तीने पोस्टात होणाऱ्या विविध रोखीच्या व्यवहारांमधे मोठ्या प्रमाणावर पैशांची अफरातफर केली. त्यात मुख्य पोस्टाच्या अखत्यारित येणाऱ्या स्थानिक पोस्टात नागरिकांच्या विविध खाते व्यवहारांसाठी जी रक्कम रोखीने पाठविली जाते, त्यावरच डल्ला मारल्याचे निदर्शनास आले. या अधिकाऱ्याने पोस्टासाठी विकसित केलेल्या सॅप प्रणालीमधे पैसे पाठविल्याची नोंद केली होती. मात्र, प्रत्यक्षात ते पैसेच पाठविले नव्हते. याकरिता स्थानिक पोस्टातील एका कर्मचाऱ्याला विश्वासात घेत तेथे देखील बनावट नोंदणी केली होती.