प्रदीप शर्मा हाच हिरेन हत्येतील मुख्य सूत्रधार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:58 AM2022-05-05T05:58:37+5:302022-05-05T05:59:04+5:30
‘एनआयए’ने प्रतिज्ञापत्रात केला दावा
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुुटुंबीयांच्या मनात दहशत बसवण्याच्या कटातील कमकुवत दुआ असलेले ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याची माहिती राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. प्रदीप शर्मा अन्य आरोपींसह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये घेतलेल्या सर्व बैठकांमध्ये हजर होता. यात हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, असे एनआयएने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा याला सुपारी म्हणून ४५ लाख दिल्याचा दावाही एनआयएने प्रतिज्ञापत्रात केला आहे. शर्मा निर्दोष नाही. त्याने फौजदारी कट, हत्या आणि दहशतवादी कृत्य केले आहे, असे एनआयएने शर्मा याच्या जामीन अर्जावर आक्षेप घेताना म्हटले.
न्या. ए.एस. चांदुरकर व न्या. जी. ए. सानप यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १७ जून रोजी ठेवली. माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला एनआयएने १७ जून २०२१ रोजी अटक केली आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहेत.