खळबळजनक! लेकीचा मृत्यू, संतापलेल्या माहेरच्यांनी सासरचं घर जाळलं, सासू-सासऱ्यांचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:01 AM2024-03-19T11:01:25+5:302024-03-19T11:16:24+5:30
नवविवाहित महिलेच्या मृत्यूनंतर धक्कादायक घटना घडली आहे. माहेरच्या लोकांनी महिलेच्या सासरच्या घरात गोंधळ घातला आणि घराला आग लावली.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एका नवविवाहित महिलेच्या मृत्यूनंतर धक्कादायक घटना घडली आहे. माहेरच्या लोकांनी महिलेच्या सासरच्या घरात गोंधळ घातला आणि घराला आग लावली. या आगीत होरपळून सासू-सासऱ्यांचा मृत्यू झाला. घरात तीन मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
मुठ्ठीगंज परिसरात काल रात्री (18 मार्च) अंशिका केसरवानी हिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना समोर आली. धुमनगंजमधील झलवा येथे राहणाऱ्या अंशिकाचं लग्न मुठ्ठीगंज येथील व्यापारी अंशूशी झाले होते. अंशिकाच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोक अंशिकाच्या सासरच्या घरी पोहोचले, तेथे तिच्या सासरच्या आणि तिच्या माहेरच्या मंडळींमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर अंशिकाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. याच दरम्यान, अंशिकाच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना घरात कोंडून ठेवलं आणि आग लावली असा आरोप आहे. ज्यामध्ये दोन लोकांचा म्हणजेच अंशिकाची सासू आणि सासरे यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी प्रयागराज डीसीपी (शहर) दीपक भूकर यांनी सांगितलं की, पोलिसांना रात्री 11 वाजता अंशिका केसरवानी नावाच्या महिलेने आत्महत्या केल्याचा फोन आला होता. यावेळी आई-वडील आणि सासरे दोघेही उपस्थित होते. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोन्ही बाजूचे लोक आपापसात भांडत होते.
त्यादरम्यान माहेरच्या मंडळींनी सासरच्या घरात आग लावल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 5 जणांची सुटका करून अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर संपूर्ण घराची झडती घेतली असता दोन मृतदेह आढळून आले.
ज्यामध्ये एक मृतदेह महिलेचे सासरे राजेंद्र केसरवानी यांचा आहे आणि दुसरा मृतदेह सासू शोभा देवी यांचा आहे.सध्या हे दोन्ही मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. घटनास्थळी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.