प्रिती दासला पुन्हा अटक, चार दिवस पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:42 PM2020-06-30T23:42:09+5:302020-06-30T23:43:32+5:30
जरीपटक्यातील खंडणी प्रकरणात कारागृहात असलेली ठगबाज प्रीती दासला गुन्हेशाखा पोलिसांनी सोमवारी पुन्हा अटक केली. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यातील खंडणी प्रकरणात कारागृहात असलेली ठगबाज प्रीती दासला गुन्हेशाखा पोलिसांनी सोमवारी पुन्हा अटक केली. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. २०१७ मध्ये प्रीतीने सीताबर्डीतील एनआयटी कॉम्प्लेक्समध्ये गॅलेक्सी कन्सलटन्सी सर्व्हिसेस नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीमार्फत ती बेरोजगारांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवायची. वर्ध्यातील अभियंता नवल राधेश्याम पांडे (२८) याला प्रीतीने नोकरीचे आमिष दाखवून दीड लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नवलने प्रीतीला पैसे परत मागितले. तिने पैसे देण्यास नकार देत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. नवलने सीताबर्डी पोलिसात तक्रार केली. मात्र प्रीतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही. प्रीतीचे कारनामे उघडकीस आल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रीतीविरुद्ध चार गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिसांकडे गेला.