भंडारा पोलिसांकडून प्रीती दासच्या घराची झडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:20 AM2020-07-07T00:20:06+5:302020-07-07T00:21:20+5:30
अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारी आणि अनेकांची फसवणूक करणारी कुख्यात महाठग प्रीती ज्योतिर्मय दास हिच्या घराची रविवारी भंडारा पोलिसांनी झडती घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारी आणि अनेकांची फसवणूक करणारी कुख्यात महाठग प्रीती ज्योतिर्मय दास हिच्या घराची रविवारी भंडारा पोलिसांनी झडती घेतली. पोलिसांना या झडतीत काहीही हाती लागले नाही, हे विशेष! नागपुरात चार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात प्रीतीविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. प्रारंभी पाचपावली पोलिसांनी पीसीआरही घेतला. त्यानंतर तिला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून तिची चौकशी केली. मात्र कोट्यवधीची मालमत्ता बळकवणाऱ्या प्रीतीकडून केवळ ६० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. त्या व्यतिरिक्त तिच्याकडे असलेली रोकड आणि मौल्यवान चिजवस्तूंसह मालमत्तेची कागदपत्रे शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. या पार्श्वभूमीवर, पोलिसांची कोठडी संपली आणि तिला कारागृहात पाठवण्यात आले. दरम्यान, शनिवारी तिला भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतले. भंडारा जिल्ह्यातील सात ते आठ बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तिने लाखो रुपये उकळले. या पार्श्वभूमीवर अटक केल्यानंतर भंडारा पोलिसांचे पथक एपीआय साठवणे यांच्या नेतृत्वात शनिवारी मध्यरात्री नागपुरात पोहोचले. प्रीतीच्या कामठी मार्गावरील घरी पोलिसांनी झाडाझडती घेतली. झडतीत काही हाती लागले नाही, अशी माहिती भंडारा पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी साठवणे यांनी लोकमत'ला दिली.
प्रीतीचा व्हिडिओ व्हायरल
एका व्यक्तीकडून पाच लाख रुपये घेताना प्रीती आणि तिच्या साथीदारांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात प्रीतीच्या साथीदारांचीही पोलीस शोधाशोध करीत आहेत. नागपुरातील दोन कथित नेत्यांची नावे भंडारा पोलिसांना मिळाली असून त्यांच्याबाबत प्रीतीकडून पोलीस काय माहिती मिळवतात, याकडे सर्वसामान्यांच्या नजरा लागल्या आहेत.