गर्भवती महिला रस्त्यावरच कोसळली, मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवली अन् पाडव्याला 'गुड न्यूज' मिळाली!
By पूनम अपराज | Published: April 15, 2021 09:10 PM2021-04-15T21:10:09+5:302021-04-15T21:15:59+5:30
Mumbai Police Well Done : थेट मुंबई पोलीस दलाच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दखल घेऊन त्या पोलिसांचं अभिनंदन केले आहे.
पूनम अपराज
वरळी नाका येथे गुढी पाडव्यादिवशी मुंबई पोलिसांनी माणुसकी आणि प्रसंगावधान दाखवत कमालीचे कार्य केले. त्याची थेट मुंबई पोलीस दलाच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दखल घेऊन त्या पोलिसांचं अभिनंदन केले आहे. ही माहिती नांगरे पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.
एक महिला अचानक वरळी नाका येथे गुढी पाडव्यादिवशी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान चक्कर येऊन पडल्या अशी माहिती मिळाली असता तात्काळ वरळी पोलिसांची मोबाइल 1 व मोबाईल 5 ही वायरलेस वाहने सदर ठिकाणी हजर झाले. महिला ही गर्भवती होती चक्कर येऊन पडल्याने तिला प्रसूती कळा चालू झाल्या होत्या. तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील किंवा ओळखीचे जवळ कोणीच नव्हते. महिलेची परिस्थिती नाजूक होती. तरी वरळी पोलीस स्टेशनमधील महिला पोलिस उपनिरक्षक रेश्मा पाटील, महिला कॉन्स्टेबल सपकळ आणि ASI माने, इतर कर्मचारी यांनी तात्काळ वेळ न दवडता प्रसंगावधान दाखवत त्या गरोदर महिलेस कोणताही विचार न करता रुग्णवाहिकेचीची वाट न पाहता पोलीस गाडीत घेऊन सोबत मदतीला पादचारी स्थानिक रहिवाशी असलेली मुलगी नामे प्रिया जाधव हिला मदतीला घेऊन नायर रुग्णालयकरिता रवाना झाले.
महिलेला अधिक त्रास होऊ लागला म्हणून महिलेला गाडीतील महिला अधिकारी व महिला अंमलदार, स्थानिक मुलगी यांनी धीर दिला आणि महिलेची प्रसूती ही नायर रुग्णालय येथे पोहचण्याआधीच पोलिस गाडीमध्ये सुखरूप झाली आणि महिलेसह बाळाचे प्राण वाचले. सदर महिला व बाळ हे सुखरूप असून महिला ही ७ महिन्यांची गरोदर असल्याने बाळाला दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या महिलेस मुलगी झाली, हा आनंदाचा क्षण सर्वांसाठी होता असे विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले. संबंधित पोलीस मोबाइल 1 वरील Asi माने, हेड कॉन्स्टेबल वळवी, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, मोबाइल ५ वरील पोलीस उपनिरीक्षक रेश्मा पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल सपकळ यांचे केलेल्या कर्तव्याबद्दल नांगरे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Proud of Mumbai police team which could render timely help to a pregnant woman in distress and could make the safe...
Posted by Vishwas Nangre Patil on Wednesday, April 14, 2021