मावशीचे भाच्यासोबत प्रेमसंबंध; त्याचं तरुणीशी लग्न लावलं; अडसर वाटताच आक्रित घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 10:37 PM2022-05-11T22:37:39+5:302022-05-11T22:37:51+5:30
बाथरुममध्ये आढळून आलेल्या 'त्या' गर्भवतीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं
गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये गर्भवतीची हत्या झाली होती. या प्रकरणी महिलेचा पती आणि मानलेल्या मावशीला अटक करण्यात आली आहे. मृत महिलेचा पती आणि त्याच्या मावशीचे अवैध संबंध होते. याशिवाय महिलेकडे हुंड्याची मागणी केली जात होती. या दोन कारणांमुळेच गर्भवतीची हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गर्भवतीच्या हत्येनंतर तिच्या पती आणि त्याच्या मानलेल्या मावशीनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कंत्राटदार आणि त्याच्या कामगारावर संशय व्यक्त केला. लूटमार करण्याच्या प्रयत्नात हत्या झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मात्र पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती समोर आली. महिलेचा पती आणि त्याची मावशीच गुन्हेगार असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. पोलिसांनी दोघांकडून ४९ हजारांची रोकड, दागिने आणि अन्य वस्तू जप्त केल्या.
पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष कुमार साहू आणि त्याची मानलेली मावशी शांती यांचे १२ वर्षांपासून अवैघ संबंध होते. लग्नानंतर संतोषची पत्नी सोनी अडसर ठरत होती. विशेष म्हणजे शांतीनेच संतोष आणि सोनी यांचा विवाह ठरवला होता. ५ मे रोजी संतोष ऑफिसला गेल्यावर शांती आणि सोनी यांच्यात वाद झाला. भांडण टोकाला गेल्यावर सोनीनं विष प्राशन केलं. त्यानंतर सोनीच्या तोंडातून फेस येऊ लागला. तिचं शरीर गार पडलं.
शांती सोनीला बाथरूममध्ये घेऊन गेली. तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला शुद्ध आली नाही. त्यानंतर केबलच्या तारेनं तिचा गळा दाबला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शांतीनं घरातल्या कपाटाचं कुलूप फोडलं आणि रोकड, दागिने काढले. मात्र बॅग घेऊन घरातून निघताना ती अनेक ठिकाणी सीसीटीव्हीत दिसली. या फुटेजमुळे पोलिसांना संशय आला. शांतीची चौकशी झाली. तिनं गुन्ह्याची कबुली दिली. सोनीचा पती संतोष मावशीच्या मदतीनं सोनीला हुंड्यासाठी त्रास द्यायचा. त्यामुळे पोलिसांनी त्यालादेखील अटक केली.