पाणीपुरी घेऊन घरी परतला पती...बाथरुमध्ये गर्भवती पत्नीचा मृतदेह अन् बाल्कनीमध्ये वृद्ध आई कैद!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 09:04 AM2022-05-09T09:04:17+5:302022-05-09T09:04:53+5:30
गाझियाबादच्या साहिबाबादमध्ये एका गर्भवती महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.
गाझियाबाद-
गाझियाबादच्या साहिबाबादमध्ये एका गर्भवती महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्ती घरात घुसले आणि महिलेची तारेनं गळा घोटून हत्या केली. यावेळी घरात एक वृद्ध महिला देखील होती. तिला घराच्या बाल्कनीमध्ये बंद करुन ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
गाझियाबाद पोलिसांच्या माहितीनुसार, साहिबाबादच्या डीएलएफ परिसरात एका महिलेचा मृतदेह बाथरुममध्ये आढळला. गर्भवती महिलेची तारेनं गळा घोटून हत्या करण्यात आली होती. डीएलएफ कॉलनीस्थित आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये रुम नंबर १७ ब्लॉक ए-३१ मध्ये राहणारे संतोष कुमार शुक्रवारी नेहमीप्रमाणे ऑफीसला गेले होते. राहत्या घरात त्यांची २० वर्षीय पत्नी संतोषी उर्फ सोनू आणि वृद्ध आई होती.
संतोषनं बाजारातून पत्नीसाठी पाणीपुरी घेतली आणि तो घरी पोहोचला. घरी पोहोचला तेव्हा पाहिलं की घरातील वीज बंद आहे. आवाज दिल्यानंतर लक्षात आलं की त्याच्या आईला बाल्कनीमध्ये कोंडण्यात आलं आहे. पत्नीचा शोध तो घेऊ लागला आणि बाथरुममध्ये तिचा मृतदेह सापडला. घरातील कपाटातील सामना अस्ताव्यस्त पडलं होतं. संतोष यांच्या माहितीनुसार त्यांची पत्नी एक महिन्यांची गर्भवती होती. त्यांनी फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कर्मचारी आणि ठेकेदार विपिन यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसही चक्रावले. गाझियाबाद ट्रान्स हिंडनचे एसपी सिटी आणि एसएसपीनं घटनास्थळावर पोहोचून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. एसएसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी कामावरुन घरी परतल्यानंतर पतीनं घरात पत्नीचा मृतदेह आणि वृद्ध आईला कोंडण्यात आल्याचं पाहिलं. त्यानंतर त्यानं पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. महिलेचा मृतदेह बाथरुममध्ये आढळला आणि घरातील कपाट तसेच लॉकर तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळालं.
प्राथमिक अंदाजानुसार चोरीच्या उद्देशानं हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एसपी सिटीच्या नेतृत्वात पोलिसांचं एक पथक तैनात करण्यात आलं असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.