पोलीस असल्याची बतावणी करून घरात घुसले अन् दागिने,पैसे पळवले; चिंचवडला जबरी चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 01:30 PM2020-08-22T13:30:10+5:302020-08-22T15:56:03+5:30
कोयत्याचा धाक दाखवून दागिने व रोकड असा एक लाख दोन हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला...
पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून चार जण घरात घुसले. कोयत्याचा धाक दाखवून दागिने व रोकड असा एक लाख दोन हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. शोकेस व लोखंडी कपाटाची काच तसेच टीव्हीवर कोयत्याने मारून तोडून फोडून नुकसान केले. दत्तनगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. २१) पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
सुंदर विलास ओव्हाळ (वय ४८, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुल कांबळे (वय २०, रा. दत्तनगर, चिचंवड) व त्याच्यासोबतच्या तीन अनोळखी आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल कांबळे व त्याच्याबरोबर तीन अनोळखी आरोपी यांनी पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादी यांच्या घरात घुसले. त्यानंतर घरातील कपाटातील व फिर्यादी यांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एक लाख दोन हजार २०० रुपयांचा ऐवज कोयत्याचा धाक दाखवून काढून घेऊन चोरी केला. तसेच घरातील शोकेस व लोखंडी कपाटाची काच, टीव्हीवर कोयत्याने मारून तोडून फोडून नुकसान केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.