पोलीस असल्याची बतावणी, गळ्याला कोयता लावत लुबाडले ! 

By गौरी टेंबकर | Published: March 4, 2024 04:35 PM2024-03-04T16:35:13+5:302024-03-04T16:35:34+5:30

चौघांना खेरवाडी पोलिसांकडून अटक, सर्व आरोपी विलेपार्लेचे रहिवाशी

Pretending to be a policeman he was robbed with a knife on his neck | पोलीस असल्याची बतावणी, गळ्याला कोयता लावत लुबाडले ! 

पोलीस असल्याची बतावणी, गळ्याला कोयता लावत लुबाडले ! 

मुंबई: पोलीस असल्याची बतावणी करत एक कॅब चालक आणि मित्राच्या गळ्याला कोयता लावत चौघांनी लुबाडले. मात्र सदर टोळके हे पुन्हा असाच प्रकार करताना आढळल्यावर ते पोलीस नसल्याची शंका आली आणि त्यांच्या सतर्कमुळे चौघांना अटक करण्यात खेरवाडी पोलिसांना यश मिळाले. 

तक्रारदार भरत मुडळे (२२) हे कॅब चालक असून त्यांचे वडील शिवाजी (५४) हे बेस्टमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. भरत यांच्या तक्रारीनुसार, ३ मार्च रोजी ते त्यांचे मित्र सिद्धेश आंद्रे (२२) जितेश विश्वकर्मा (२२) यांच्यासह मरीन ड्राईव्ह फिरण्यासाठी वडिलांची कार घेऊन गेले होते. परतत असताना रात्री २ वाजता एम एम आर डी ए जंक्शनजवळ ते लघुशंकेसाठी थांबले. तक्रारदार आणि आंद्रे खाली उतरल्यावर एका मोटरसायकल वरून चार जण त्याठिकाणी आले आणि आम्ही पोलिस आहोत असे म्हणत त्यांच्याकडे जबरदस्ती पैसे मागू लागले. मात्र भरतनी त्याना पैसे द्यायला नकार दिला. तेव्हा त्यातल्या एकाने त्याच्या हातात असलेला कोयता भरतच्या गळ्याला लावत पैसे दे नाहीतर गळा कापेन अशी धमकी दिली. तर दुसऱ्याने भरतच्या खिशात हात घालून १२०० रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच आंद्रेचाही मोबाईल खेचत बळजबरी स्वतःच्या खात्यावर ४०० रुपये ऑनलाइन पाठवले.

भरत यांनी त्यांच्या मोटर सायकलचा नंबर पहिला आणि त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी कलानगर जंक्शनकडे अन्य एका व्यक्तीकडून ते पैसे मागताना दिसले. तेव्हा ते पोलीस नसल्याची शंका तक्रारदार आणि त्याच्या मित्रांना आली. त्यांनी त्यांची कार तोतया पोलिसांच्या मोटरसायकल समोर आडवी लावली. तितक्यात गस्तीवर असलेले खेरवाडी पोलीस त्याठिकाणी आले आणि घडला प्रकार तक्रारदाराने त्यांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी आदित्य पटेल (१९), गणेश कोळेकर (२२) , साहील शिरस्वाल (१९) तसेच रमेश शेट्टी (२२) यांना अटक केली. हे चौघे विलेपार्ले परिसरातील राहणारे असून पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: Pretending to be a policeman he was robbed with a knife on his neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.