कौमार्यचाचणीस विरोध करणाऱ्या मुलीला दांडिया खेळण्यास रोखले; सामाजिक बहिष्काराचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 03:39 PM2018-10-16T15:39:17+5:302018-10-16T15:47:30+5:30
कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथांना फाटा देत विवाहबद्ध झालेली ऐश्वर्या तमायचीकर हिला दांडिया खेळण्यापासून रोखल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पिंपरी : कौमार्यचाचणी प्रथेविरोधात आवाज उठवुन,कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथांना फाटा देत विवाहबद्ध झालेली ऐश्वर्या तमायचीकर हिला दांडिया खेळण्यापासून रोखल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक, निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांमध्ये भाटसमाज तरूण मंडळाचे कार्यकर्ते भूपेंद्र तमायचीकर,अक्षय तमायचीकर,अक्षय माछरे, विशाल तमायचीकर, अभय भाट,धिरज तमायचीकर, विकास मलके, आकाश राठोड (सर्व रा. भाटनगर) यांचा समावेश आहे
दरम्यान, समाजाचा विरोध पत्करून परिवर्तनाचे पाऊल टाकण्याचा निर्धार केलेल्या ऐश्वर्या आणि विवेकचा १३ मे २०१८ ला रोजी पिंपरीत विवाह झाला होेता. त्यावेळी कडक पोलीस बंदोबस्तात आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विवाह झाल्यानंतर विवेक आणि ऐश्वर्या मुंबई अंबरनाथला निघून गेले होते. सध्या नोकरीनिमित्ताने ऐश्वर्या खराडी येथे असते.
ऐश्वर्या लग्नानंतर प्रथमच आईकडे आली होती. सोमवारी (दि.१६) रात्री भाटनगर येथे दांडियाच्या कार्यक्रमास गेली असता, मंडळाने दांडियाचा कार्यक्रम बंद केला. मैत्रिणीबरोबर दांडिया खेळण्यास गेलेली ऐश्वर्या थोडावेळ तेथेच थांबली. मात्र, ती तेथून निघून जाईपर्यंत मंडळाने दांडियाचा कार्यक्रम सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऐश्वर्या तेथून निघून गेल्याचे लक्षात येताच संयोजकांनी पुन्हा ध्वनीक्षेपक सुरू करून दांडियाचा खेळसुद्धा सुरू केला. बाहेर पडलेल्या ऐश्वर्याने थेट पोलीस ठाणे गाठले. घडला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर मंगळवारी दुपारी सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यानुसार संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ऐश्वर्या सोमवारी पिंपरीतील भाटनगरमध्ये राहणाऱ्या आईकडे आली होती. रात्री साडेआठच्या सुमारास भाटनगर येथे दांडियाचा कार्यक्रम सुरू होता. दरवर्षीप्रमाणे या दांडिया कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती पुढे गेली. तिने दांडिया सुरू असलेल्या मंडपात पाऊल टाकताच, संयोजकांनी ध्वनीक्षेपक बंद करत दांडियाचा कार्यक्रम त्वरित थांबविला. ऐश्वर्याची आई तेथे आली, तू येथून चल,काहीतरी गडबड होवू शकते, असे म्हणुन तेथून बाहेर पडण्यास आई विनंती करू लागली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी तिचा जबाब नोंदवुन घेत दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्याद दाखल करून घेण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ऐश्वर्या मंगळवारी दुपारी पिंपरी पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यातील कलम ३ (१) नुसार ऐश्वयार्ला दांडिया खेळण्यास मज्जाव करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.