राजगड पोलिसांची ४७० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 06:09 PM2019-04-02T18:09:19+5:302019-04-02T18:10:20+5:30
जिल्ह्यातील मतदारसंघांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असल्याने पोलीस यंत्रणेवर ताण येणार आहे.
नसरापूर : लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी राजगड पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक हाणामारीचे गुन्हे दाखल असणाऱ्या ४७० गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत. जिल्ह्यातील मतदारसंघांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असल्याने पोलीस यंत्रणेवर ताण येणार आहे. निवडणुकीच्या वेळी गुन्हे दाखल झालेल्यांची वेगळी यादी तयार केली आहे. ४७० गुन्हेगारांपैकी ४५ जणांवर दोन वर्षांसाठी तर २८१ जणांवर पंधरा दिवसांसाठी तडीपार करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत ४५ जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात येणार आहे. या निवडणूक कालावधीत पंधरा दिवसांसाठी २८१ जणावर तडीपार करण्याचे प्रस्ताव प्रांताधिकारी तहसीलदार आणि पोलीस अधिक्षक यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.
या गुन्हेगारांचा वापर निवडणुकीत होऊ नये म्हणून पोलिसांनी आत्तापासूनच उपाययोजना सुरू केली आहे. रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असून, त्यात संशयित गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. दोनपेक्षा अधिक हाणामारीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. या पुढील काळात कोम्बिंग ऑपरेशन आणखी प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींवरील गुन्ह्यांच्या तीव्रतेनुसार कोम्बिंग ऑपरेशन किंवा नाकाबंदीत पकडलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत गुन्हेगारांकडून निवडणूक काळामध्ये चांगल्या वागणुकीसाठी प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईतांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. परिसरात दहशत पसरविणाऱ्यांवर मोक्का किंवा एमपीडीएची कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले. आगामी निवडणुका आणि प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.