कन्टेंमेंट झोनमध्ये गेल्याने आमदार धस यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 07:19 PM2020-05-19T19:19:52+5:302020-05-19T19:20:33+5:30
सांगवी पाटण हे गाव कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे
कडा/आष्टी : कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सांगवी पाटण हे गाव कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. मात्र त्यानंतरही विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन तेथील लोकांशी संवाद साधला. यामुळे आष्टी पोलिस ठाण्यात आ. धस यांच्या विरोधात आपतकालीन कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हे गाव कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. या गावामध्ये प्रवेश बंदी असतानाही सोमवारी आ. सुरेश धस यांनी आपल्या खासगी वाहनाने गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गस्तीवरील पोलिसांनी अडवले असता आपण लोकप्रतिनिधी असल्याचे सांगून आ. धस यांनी गावात प्रवेश केला. यामुळे आ. धस यांच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 155/20 कलम 188, 269, 270 भा.दं.वि. 17 महाराष्ट्र पोलिस कायदा, 51/2 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळामधला आ. धस यांच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.
लोकांना धीर देण्यासाठी गेलो होतो
पाटण सांगवी गावांमध्ये प्रचंड घबराहट आहे. त्यामुळे लोकांना घाबरू नका असा दिलासा व धीर देण्यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन करून गावात गेली होतो. बफर झोन माहिती होते, कंटेनमेंट झोन बाबत माहिती नाही. मी काही सराईत गुन्हेगार नाही.
- आ. सुरेश धस