अनिल देशमुखांना कसे मिळाले सचिन वाझेकडून ४.७ कोटी?; कोर्टात झाला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 06:59 PM2021-09-19T18:59:20+5:302021-09-19T19:01:21+5:30
अनिल देशमुख यांनी ही रक्कम ऋषिकेश देशमुख यांच्या सांगण्यावरुन हवालाच्या माध्यमातून सुरेंद्र जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवली.
मुंबई – १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणावरुन अडचणीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समस्येत भर पडताना दिसत आहे. मुंबईच्या विशेष कोर्टाने प्रथम दर्शनी अनिल देशमुख यांना सचिन वाझे आणि त्यांचा सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याकडून ४.७ कोटी रुपये मिळाल्याचं दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. सध्या ईडीकडून अनिल देशमुखांविरोधात चौकशी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंग आणि सचिन वाझे प्रकरणी आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले आहे.
ईडीने(ED) या महिन्याच्या सुरुवातीला सचिन वाझे, अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांचे सचिव संजीव पालांडे, खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांच्यासह ११ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष कोर्टाचे न्यायाधीश एम. जी देशपांडे यांनी आरोपपत्राचा आढावा घेतला त्यानंतर शनिवारी याविषयी टीप्पणी दिली. कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटलं की, साक्षीदार आणि आरोप याबाबत काळजीपूर्वक अभ्यास केला असता प्रथम दर्शनी पैशाच्या व्यवहार झाल्याचं दिसून येते. अनिल देशमुख यांना सचिन वाझे आणि कुंदन शिंदे यांच्याकडून ४.७ कोटी रुपये मिळाले होते. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे.
अनिल देशमुखांनी ही रक्कम साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर वळवली
कोर्टाने म्हटलं की, अनिल देशमुख यांनी ही रक्कम ऋषिकेश देशमुख यांच्या सांगण्यावरुन हवालाच्या माध्यमातून सुरेंद्र जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवली. त्यानंतर कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर जमा केली जी केवळ कागदावर राहिली. ही अनिल देशमुख यांच संस्था आहे. आरोपीविरोधात मनी लॉन्ड्रिंग अधिनियम कायद्यातंर्गत कारवाई करण्यासाठी हा पुरेसा पुरावा आहे. ऋषिकेश देशमुख हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा आहे.
सचिन वाझेची ईडीकडून चौकशी
मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे(Sachin Vaze) याने फेब्रुवारीत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली होती. त्यानंतर मार्चमध्ये त्यांना अटक करण्यात आली. सध्या ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सचिन वाझेची चौकशी करत आहे. कोर्टाने सर्व आरोपींना समन्स जारी केला आहे. पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला होणार आहे. आरोप पत्रात देशमुखांचे नाव नाही परंतु तपास सुरू आहे. आरोपपत्राची व्याप्ती वाढवता येईल असं ईडीने सांगितले आहे.