भूमिगत सदस्यांसह पंतप्रधानांच्या हत्येचा कट, दोषारोपपत्रात पुणे पोलिसांचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 08:12 PM2018-11-16T20:12:56+5:302018-11-16T20:34:31+5:30
भूमिगत सदस्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट केल्याचे स्पष्ट झाल्याचे पुणे पोलिसांनी याप्रकरणात सादर केलेल्या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
पुणे : बंदी असलेल्या सीबीआय माओवादी या संघटनेच्या ईस्टर्न रिजनल ब्युरो (ईआरबी) समितीचा सचिव व केंद्रीय समिती सदस्य किशनदा उर्फ प्रशांत बोस आणि रोना विल्सन यांच्यासह संघटनेच्या इतर भूमिगत सदस्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट केल्याचे स्पष्ट झाल्याचे पुणेपोलिसांनी याप्रकरणात सादर केलेल्या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी पार पडलेल्या एल्गार परिषदेच्या दुस-या दिवशी कोरेगाव-भिमा येथे झालेल्या हिंसाचाराची अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यातील १० आरोपींच्या विरोधात गुरुवारी पुणे पोलिसांनी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. अटक करण्यात आलेले सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ.एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दिपु आणि कॉ. मंगलु अशा दहा जणांविरोधात गुरुवारी ५ हजार १६० पानी दोषारोपत्र न्याायालयात दाखल केले.
दोषारोपत्रात नावे असलेल्या आरोपींचा पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्यात आणि लोकशाही शासन व्यवस्था व देशातील नागरिकांच्या विरोधात युद्ध पुकारण्यासाठी सीपीआय (एम) या संघटनेच्या व्यापक कट कारस्थानाचा भाग म्हणून व त्या उद्देशाने अवैध हत्यार व दारुगोळा मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींच्या भूमिका देखील दोषारोपत्रात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
प्रशांत बोस यांच्यासोबत रोना विल्सन यांचे ईमेलद्वारे झालेले संभाषण पोलिसांना मिळाले होते. त्याबाबतचे एक पत्र देखील पोलिसांच्या हाती आले होते. माओवाद्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला होता. रोड शोच्या दरम्यान घातपात घडवून पंतप्रधान राजीव गांधीची ज्या पद्धतीने स्फोट घडवून हत्या करण्यात आली होती. त्याच पद्धतीने घातपात घडवून आणण्याचा कट केल्याचा त्या पत्रात उल्लेख होता. आरोपींच्या वकिलांकडून हे सर्व पत्रे खोटी असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अटक आरोपींकडून मिळालेले कागदपत्रे, इलेक्ट्रानिक डिव्हाइसमधील डेडा आणि गुप्त पद्धतीने झालेल्या बैठकांच्या मिनिट्सवरून संघनेतील माओवाद्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले आहे.
.................................
कट सिद्ध करणारे कागदपत्रे हाती
माओवादी संघटनेतील सदस्यांचा संवाद असलेली १३ पत्रे हाती आली आहेत. त्यातील एका पत्रात हत्येच्या कटाचा उल्लेख आहे. तसेच याबाबत भूमिगत माओवाद्यांच्या बैठका झाल्या होत्या. त्याचे मिनिट हाती आले असून इतर काही कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी हत्येचा कट केल्याचे स्पष्ट होते, असे याप्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
.............................
कटाशी संबंध कसा
या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या न्यायालयात युक्तिवाद केला होता की, अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींचा हत्येच्या कटाशी संबंध नाही. जर नंतर अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींचा हत्येच्या कटात सहभाग नसेल तर दोषारोपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींचा कटात सहभागी कसे होतील. याबाबतचे कागदत्रे देखील पोलिसांनी दाखवलेले नाही, असे बचाव पक्षांचे वकील अॅड.राहुल देशमुख यांनी सांगितले.