सात बारासाठी लाच मागणाऱया तलाठ्यासह खासगी व्यक्ती जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 09:54 PM2021-02-13T21:54:33+5:302021-02-13T21:55:04+5:30
Crime News : तक्रारदाराने तलाठी कोकाटे यांच्याकडे सातबारा उतार्यावर नावनोंदणी आणि जमीन वाटप नोंद करण्याबाबत कागदपत्रे सादर केली होती. हे काम करण्यासाठी तलाठी कोकाटे यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली.
सातबारा उतार्यावर नावनोंदणी तसेच जमीन वाटपाची नोंद करण्यासाठी प्रत्येकी २० अशी ४० हजारांची लाच घेणार्या भीमा कोरेगाव येथील तलाठी महिलेसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. तलाठी अश्विनी दत्तात्रय कोकाटे, आणि खासगी व्यक्ती निवृत्ती लक्ष्मण कानगुडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने तलाठी कोकाटे यांच्याकडे सातबारा उतार्यावर नावनोंदणी आणि जमीन वाटप नोंद करण्याबाबत कागदपत्रे सादर केली होती. हे काम करण्यासाठी तलाठी कोकाटे यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला. मध्यस्थ कानगुडे याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर जवळच असलेल्या तलाठी कोकाटे यांनी २० हजार रुपये लाच स्वीकारली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योती पाटील अधिक तपास करीत आहेत.