फी न भरल्यामुळे खाजगी शाळेतील शिक्षकाची विद्यार्थाला जबर मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 01:05 PM2022-08-19T13:05:27+5:302022-08-19T13:05:33+5:30
Teacher killed student in Shravasti: उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Teacher killed student in Shravasti:उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या 250 रुपयांच्या फीसाठी एका शिक्षकाने तिसरीत शिकाणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली की त्यात त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे मुलाच्या कुटुंबीयांमध्ये व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
8 ऑगस्ट रोजी शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याला फी न दिल्याच्या कारणावरून शिक्षकाने 13 वर्षीय ब्रिजेशला बेदम मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मारहाणीनंतर मुलाला उपचारासाठी बहराइच येथे नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान काल सायंकाळी उशिरा विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांसह स्थानिकांनी भिंगा सिरसिया रस्ता रोखून आंदोलन केले. पोलिसांच्या आश्वासनानंतर प्रकरण कसेबसे शांत झाले. मृत विद्यार्थ्याच्या काकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भावाने सांगितली घटना
मृताच्या भावाने सांगितले की, वर्गात येताच शिक्षकाने ब्रिजेशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, माझ्या भैय्याने फी जमा केल्याचे मी सांगत राहिलो. पण मुख्याध्यापकांशी न बोलता आणि सत्य जाणून न घेता शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. भाऊ घरी पोहोचला, तेव्हा त्याची प्रकृती बिघडली होती. कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरांकडे नेले, पण त्याचा अखेर मृत्यू झाला.
सीएम योगींना आवाहन
शिक्षकाची क्रूरता आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना यूपीच्या श्रावस्ती जिल्ह्यातील सिरसिया पोलीस स्टेशन परिसरातील एका खाजगी शाळेतील आहे. पंडित ब्रह्मदत्त उच्च माध्यमिक विद्यालय असे शाळेचे नाव आहे. आता नातेवाईकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायासाठी आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.