भिवंडीत तीन कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तीन कंटेनर जप्त
By नितीन पंडित | Published: February 20, 2024 04:10 PM2024-02-20T16:10:22+5:302024-02-20T16:10:27+5:30
या गुन्ह्याचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव हे करीत आहेत.
भिवंडी: ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तीन कंटेनर मधून आणला जात असलेला गुटखा ,जर्दा असा एकूण तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तिघा चालकांना अटक केली आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस. स्वामी यांनी महामार्गावरून होणाऱ्या गुटखा तस्करीवर पाळत ठेवण्याचे आदेश देत कार्यक्षेत्राच्या हद्दीतील अवैध दारु, जुगार,अंमली पदार्थ तसेच मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणे कामी व त्यास प्रतिबंधक करणेकामी सुचना दिलेल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव,पोलिस हवालदार उमेश ठाकरे,हनुमंत गायकर, भगवान सोनावणे,सुहास सोनावणे,हेमंत विभुते,धनाजी कडव,संतोष सुर्वे,पोलिस नाईक जितेंद्र वारके,योगेश शेळकंदे, स्वप्नील बोडके या पोलिस कर्मचाऱ्यांचे ठाणे ग्रामीण जिल्हयात अमली पदार्थ,प्रतिबंधीत गुटखा,अवैधदारु जुगार याचेबाबत माहीती मिळवुन कारवाई करणेकामी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते.
पोलिस पथकास नाशिक मुंबई महामार्गा वरून गुटखा व प्रतिबंधित तंबाखू यांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील येवई गावाच्या हद्दीतील शामीयाना धाब्याचे समोरील रस्त्यावर कांती मोटार्स या दुकानाच्या समोर सापळा रचला.संशयित तीन कंटेनर तेथे उभे असलेले आढळून आले.या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये मानवी आरोग्यास अपायकारक व प्रतिबंधित ३ कोटी ५५ लाख १४ हजार ३१० रुपये किमतीचा जाफरानी जर्दा तंबाखू,गुटखा याची वाहतुक करीत असताना आढळून आला.पोलिस पथकाने या कंटेनर वरील ताहीर सिताब खान,मोहम तारीफ हबीब खान,जाहुल यासीन हक सर्व रा.राजस्थान यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तिन्ही चालकांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव हे करीत आहेत.