श्रीलंकेत झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या चॅनेलवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 07:29 PM2019-05-01T19:29:20+5:302019-05-01T19:31:33+5:30
या हल्ल्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचे तपासात समोर आले आहे.
कोलंबो - श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोत ईस्टर संडेला झालेल्या दहशतवादी साखळी बॉम्बस्फोटात २५३ नागरिक ठार झाले तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे श्रीलंका सरकारने झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या चॅनेलवर बंदी घातली आहे.
पीस टीव्हीच्या सहाय्याने झाकीर नाईक हा तरुणांचे ब्रेनवॉश करतो. तसेच त्या तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करतो. त्यामुळेच भारत व बांग्लादेशने झाकीर नाईकच्या या चॅनेलवर आधीपासूनच बंदी घातली आहे. श्रीलंका बॉम्बस्फोटात देखील त्याचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कोलंबोतील शांगरिला हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याला झाकिर नाईकची भाषणं ऐकायला आवडतं असत. काही दिवसांपूर्वी हाशिमने एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. त्यात त्याने श्रीलंकेतील मुसलमान झाकीर नाईक यांच्यासाठी काय करू शकतात?, असा प्रश्न केला होता. २०१६ साली भारत सरकारने झाकीर नाईक आणि त्याच्या संघटनेवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. नाईक सध्या मलेशियात लपून बसला आहे. काही वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या हल्लेखोरांकडे नाईक याची भडकाऊ भाषणं आढळून आली होती.