वॉशरूमला जाण्यास मनाई करीत विवाहितेचा छळ, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 02:49 AM2019-03-23T02:49:30+5:302019-03-23T02:49:43+5:30
घटस्फोटासाठी चाकूने मारून टाकण्याची धमकी देत विवाहितेचा छळ केल्याचे समोर आले आहे. तसेच घरात बंद करून ठेवत महिलेस वॉशरूमला जाण्यासही सासू-सासऱ्यांनी मनाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी : घटस्फोटासाठी चाकूने मारून टाकण्याची धमकी देत विवाहितेचा छळ केल्याचे समोर आले आहे. तसेच घरात बंद करून ठेवत महिलेस वॉशरूमला जाण्यासही सासू-सासऱ्यांनी मनाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीसवर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील विवाहित महिलेच्या पतीने ९ मार्च २०१९ रोजी धमकी दिली. मला तू घटस्फोट दे, नाही तर तुला चाकूने मारून टाकीन.
फिर्यादी महिलेचे सासू आणि सासरे यांनीही १८ मे २०१८ पासून वेळोवेळी महिलेचा छळ केला. घरातील कोणत्याही वस्तूस हात लावू न देता पिण्याच्या पाण्यास व वॉशरुमला जाण्यास मनाई केली. घरामध्ये बंद करून ठेवले. तुझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये रितीरिवाजानुसार काही दिले नाही म्हणून हाताने मारहाण केली. भाड्याने घेतलेल्या खोलीच्या अनामत रकमेसाठी पतीने महिलेच्या आईकडून २० हजार रुपये घेतले होते. ते परत न करता तुझ्या आई-वडिलांकडून आणखी दहा लाख रुपये व्यवसायासाठी घेऊन ये, असे वारंवार सांगत होते. ते आणले नाहीत म्हणून पती, सासू आणि सासºयाने विवाहित महिलेला त्रास दिला.