गांधी जयंतीनिमित्त कैद्यांना शिक्षेत सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 08:55 PM2018-08-09T20:55:48+5:302018-08-09T20:57:16+5:30
महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रम होत आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याच्या गृहविभागाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांमध्ये विविध गुन्ह्यांखाली जेरबंद असलेल्या कैद्यांच्या शिक्षेत विशेष सूट देण्यासंदर्भात अटी-शर्तीनुसार प्रस्ताव मागविले आहेत.
गणेश वासनिक
अमरावती - केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील कारागृहांत असलेल्या कैद्यांच्या शिक्षेत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या गृहविभागाने बंदीवान कैद्यांच्या शिक्षेत सूट देण्यासंदर्भात प्रस्ताव मागविले आहेत. कैद्यांना तीन टप्प्यांत याचा लाभ मिळणार आहे.
महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रम होत आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याच्या गृहविभागाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांमध्ये विविध गुन्ह्यांखाली जेरबंद असलेल्या कैद्यांच्या शिक्षेत विशेष सूट देण्यासंदर्भात अटी-शर्तीनुसार प्रस्ताव मागविले आहेत. कैद्याची कारागृहातील वागणूक, गुन्ह्याचे स्वरूप, पॅरोलवर सुटका, सुटी घेतल्यानंतर कारागृहात वापसी आदी महत्त्वाच्या बाबी तपासूनच प्रस्ताव पाठविण्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
कैद्यांना शिक्षेत सूट देण्यासाठी तीन टप्पे पाडले आहेत. यात पहिला टप्पा २ आॅक्टोबर २०१८, दुसरा टप्पा ६ एप्रिल २०१९, तर तिसरा टप्पा २ आॅक्टोबर २०१९ असा केंद्र सरकारने निश्चित करण्यात आला आहे. पात्र कैद्यांची यादी कारागृह अधीक्षकांना शासनाकडे पाठवावी लागणार आहे. कैद्यांच्या शिक्षेत सूट मंजूर करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली आहे. गृहविभागाचे अपर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव, कारागृह विभागाचे महानिरिक्षक आणि विशेष महानिरीक्षकांचा यात समावेश असणार आहे.
या कैद्यांना मिळणार सूट
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, ५० टक्के शिक्षा पूर्ण झालेल्या ५५ वर्षानंतरच्या महिला कैदी, ६० वर्षानंतरचे पुरुष कैदी, ७० टक्के अपंगत्व असलेले दिव्यांग यांना सूट मिळेल. लिंग परिवर्तित कैदी असल्यास ५५ वर्षाची अट राहील.
हे कैदी अपात्र
फाशीची शिक्षा, जन्मठेपेचे कैदी, ताडा, पोटा, यूएपीए, रासुका, गैरकायदेशीर कारवाया, हुंडाबळी, बनावट नोटा, पोक्सोे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कृत्याखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना सूट मिळणार नाही.
गृहविभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे बुधवारी प्राप्त झाली. त्यानुसार कैद्यांचे प्रस्ताव पाठविले जातील. अटी-शर्तींच्या अनुषंगाने कैद्यांच्या नावांची छाननी सुरू झाली आहे. येत्या आठवड्यात प्रस्ताव पाठविले जातील.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती