पत्राचाळप्रकरणी वाधवान बंधूंची गोव्यातील मालमत्ता ईडीकडून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 08:13 AM2023-04-04T08:13:00+5:302023-04-04T08:13:13+5:30

मालमत्तेमध्ये १,२५० चौरस मीटर आणि १५,३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दोन भूखंडांचा समावेश असून याची किंमत ३१ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे.

Property of Wadhawan brothers in Goa seized by ED in case of correspondence | पत्राचाळप्रकरणी वाधवान बंधूंची गोव्यातील मालमत्ता ईडीकडून जप्त

पत्राचाळप्रकरणी वाधवान बंधूंची गोव्यातील मालमत्ता ईडीकडून जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणातील घोटाळाप्रकरणी राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांची उत्तर गोवा येथे असलेली मालमत्ता सोमवारी ईडीने जप्त केली. या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये १,२५० चौरस मीटर आणि १५,३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दोन भूखंडांचा समावेश असून, याची किंमत ३१ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे.

हे दोन्ही भूखंड वाधवान बंधूंनी २०११ मध्ये खरेदी केले होते. या भूखंडांतील आर्थिक व्यवहारामध्ये वापरण्यात आलेला पैसा हा गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्यातील असल्याचा ईडीचा दावा आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ येथील ६७२ रहिवाशांच्या घरांच्या पुनर्विकासाचे काम गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. या कंपनीत वाधवान बंधू संचालक होते.

या पुनर्विकासासाठी गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनी, म्हाडा आणि सोसायटी यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता. मात्र, गुरूआशिष या विकासक कंपनीने म्हाडाची दिशाभूल करत त्या भूखंडाचा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) नऊ अन्य विकासकांना विकला आणि त्या बदल्यात ९०१ कोटी ७९ लाख रुपये कमावले. याखेरीज कंपनीने मेडोज नावाच्या आणखी एका प्रकल्पाची घोषणा करून प्रकल्पाच्या बुकिंगमधून १३८ कोटी रुपये जमा केले. हा तपास ईडीकडे वर्ग करण्यात आला होता. 

अशी केली कर्जफेड

गोव्यामधील भूखंडासाठी त्यांनी इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लि. कंपनीकडून २८ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड त्यांनी वैयक्तिक खात्यातील पैशांतूनच केल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. मनी लाॅंड्रिंग कायद्यांतर्गत गोव्यातील ही मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

Web Title: Property of Wadhawan brothers in Goa seized by ED in case of correspondence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.