घबाड सापडले! सनदी अधिकाऱ्याकडे १५० कोटींची मालमत्ता; पूजा सिंघल यांच्यावर ईडीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 06:14 AM2022-05-08T06:14:54+5:302022-05-08T06:15:32+5:30
झारखंड, बिहारसह देशाच्या अनेक राज्यांत दुसऱ्या दिवशीही छापे मारण्यात आले. पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांना ताब्यात घेतले आहे.
एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
रांची : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आयएएस अधिकारी व झारखंडमधील खनन व उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. यात १५० कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचे दस्तावेज मिळाले आहेत.
झारखंड, बिहारसह देशाच्या अनेक राज्यांत दुसऱ्या दिवशीही छापे मारण्यात आले. पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांना ताब्यात घेतले आहे. आजवर १९.३१ कोटींची रोकड जप्त केली आहे. खुंटीच्या मनरेगा घोटाळ्यात ईडी त्यांच्यावर एवढी मोठी कारवाई करील, याबाबत कोणालाही कल्पना नव्हती.
ईडीने आता सीबीआयला पत्र लिहिले असून, गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सीबीआय गुन्हा दाखल करू शकतो. पूजा सिंघल खुंटी व चतरामधील मनरेगा घोटाळ्यातही अडकलेल्या आहेत.
पतीच्या हॉस्पिटलवर ईडीची नजर
n पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांच्या पल्स रुग्णालयावरही ईडीची नजर आहे. यामार्फत मनी लाँड्रिंग केल्याचा संशय आहे. मनी लाँड्रिंगसाठी मेधांश हॉस्पिटल प्रा. लि. ची स्थापना करण्यात आली.
n त्यानंतर पल्स संजीवनी हेल्थ केअर प्रा. लि. नावाने कंपनी बनवून तिचे एकत्रीकरण केले. पल्स संजीवनी हेल्थ केअर प्रा. लि.मध्ये अभिषेक झा हे एम. डी. आहेत.
n पूजा यांचे बंधू सिद्धार्थ सिंघल, अभिषेक झा यांची बहीण अमिता झा व दीप्ती बॅनर्जी हेही संचालक आहेत. याच पत्त्यावर मेधांश हॉस्पिटल प्रा. लि. आहे. या दोन्हींचे २०१६ मध्ये एकत्रीकरण झाले.