तळोजा कारागृहामध्ये कैद्याचे उपोषण; रक्षकाकडून मारहाणीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 08:09 PM2019-09-24T20:09:50+5:302019-09-24T20:12:36+5:30
कुटुंबियांचाही आंदोलनाचा इशारा
मुंबई - खूनाच्या आरोपाखाली नवी मुंबईतील तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या जोरावर सिंह कौर याने तरुंग अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या छळाच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपासून जेलमध्ये उपोषण सुरु केले आहे. त्याने अन्नत्याग केला असून त्याला भेटू दिले जात नसल्याचा आरोप त्याची बहिण विरेंदर कौर यांनी केला आहे. भावाच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी तुरुंग प्रशासन जबाबदार असेल, त्यांच्या निषेधार्थ आपणही कारागृह महासंचालकांच्या कार्यालयसमोर आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.
जोरावर सिंह हा गेल्या दीड वर्षापासून तळोजा कारागृहात आहे. त्याला पंजाबमधील एका गुन्ह्यात शिक्षा झाली आहे. तसेच खारघर येथे एका न्यायाधिशाच्या पत्नीचा सुपारी घेवून खून केल्याचा आरोप आहे. वर्षभरापूर्वी त्याला कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली होती, त्यामध्ये तोंडावर जखमा पायाला फॅक्चर होवूनही जेल प्रशासनाने उपचाराकडे दुर्लक्ष केले होते. उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केल्यानंतर जेल व रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ही बाब स्पष्ट झाल्यानंतर सहा तरुगांधिकाऱ्यांविरुद्ध जबर मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. काहींना निलंबित करण्यात आलेले आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायालयात लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये अधिकाऱ्यांना फायद्याचे ठरण्यासाठी जोरावर सिंह याला पंजाब जेलमध्ये पाठविण्याची विनंती प्रशासनाकडून न्यायालयाकडे करण्यात आली आहे. त्याला जोरावर व त्याच्या कुटुंबियांनी याने नकार दिल्याने जेलमध्ये मारहाण व छळ करण्यात येत आहे, त्यामुळे तीन दिवस त्याने अन्नत्याग केला असून आपल्याला व वकीलाला भेटू दिले जात नाही, असा आरोप तिची बहिण विरेंद्रर कौर यांनी केला.
तळोजा जेलकडून उडवाउडवीची उत्तरे
तळोजा कारागृहात दुरध्वनी करुन घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता सुरक्षारक्षाकडून टाळाटाळ करण्यात आली. जेल अधीक्षकांना फोन देण्यास सांगितले असता ते नाहीत, असा काही प्रकार घडलेला नाही, असे सांगत तेथील नियंत्रण कक्षातील रक्षकाने नाव न सांगता फोन कट केला.