ठाण्यात लहान मुलांना पेन टोचणारा मनोरुग्ण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 07:57 PM2018-08-09T19:57:44+5:302018-08-09T19:58:55+5:30
नौपाडा पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या मुलाचे नाव अभिषेक मोरे (वय - २१) असून त्याची गेल्या दिड वर्षांपासून मनोरुग्ण असल्याने मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार सुरु
ठाणे - पाचपाखाडी परिसरातील सरस्वती माध्यमिक शाळेच्या तिघा विद्यार्थ्यांना सातत्याने पेन टोचणाऱ्या ठाण्याच्या मनोरुग्ण मुलाचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पालकांनी तक्रार करताच अखेर नौपाडा पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या मुलाचे नाव अभिषेक मोरे (वय - २१) असून त्याची गेल्या दिड वर्षांपासून मनोरुग्ण असल्याने मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार सुरु असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी ''लोकमत''शी बोलताना दिली.
तो उच्च शिक्षित घरातील मुलगा असून मनोरुग्ण असल्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान ताब्यात घेतलेला मुलगा हा मानसिक आजाराने पीडित असून त्याच्या वडिलांनी त्याला दम दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिषेकची बहीण एमबीए आहे तर वडील शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी संवेदनशिलता दाखवत केलेल्या कारवाईमुळे पालकवर्गाचा जीव भांड्यात पडला.