PUBG Murder: 'पबजी'चं वेड घातक! चिमुकल्याचं तोंड 'Feviquick'नं चिकटवलं, हात-पाय बांधले अन् टॉयलेटमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 12:41 PM2022-07-09T12:41:31+5:302022-07-09T12:42:36+5:30
PUBG Game Addicted Killed Minor Boy: पबजी गेमच्या वेडापायी घडणाऱ्या धक्कादायक घटनांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे.
PUBG Game Addicted Killed Minor Boy: पबजी गेमच्या वेडापायी घडणाऱ्या धक्कादायक घटनांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एका मुलाचं अपहरण करुन हत्या केल्याच्या प्रकरणात ट्यूशन टीचरच्या मुलाला, सुनेला आणि नातवाला अटक करण्यात आली आहे. एका ६ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह ट्यूशन टीचरच्या घरातील बाथरुममध्ये आढळून आळा आहे. पबजी गेमचं भयंकर वेड लागलेल्या नातवानं आपल्या आजोबांना फसवण्यासाठी हे कृत्य केल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.
लार येथील हरखौली गावातील रहिवासी गोरख यादव यांचा ६ वर्षांचा मुलगा गेल्या आठवड्यात बुधवारी गावातील वयोवृद्ध शिक्षक असलेले नरसिंह विश्वकर्मा यांच्याकडे शिकवणीसाठी गेला होता. पण तो घरी परतलाच नाही. घरच्यांनी आपल्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली पण तो कुठेच सापडला नाही.
काही वेळानंतर गावातील एका शेतात एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत मुलगा जिवंत हवा असेल तर पाच लाख रुपयांची व्यवस्था करा अशी धमकी देण्यात आली होती. स्थानिक पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी रात्रभर चौकशी केली पण काहीच हाती लागलं नाही. पोलिसांनी संशयाच्या पातळीवर सर्वांची चौकशी करण्यास सुरुवात केली. यात हरवलेला मुलगा ज्यांच्या घरी ट्यूशनसाठी गेला होता त्या वयोवृद्ध शिक्षकाचा मुलगा राजकुमार याचीही पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत पोलिसांना संशयास्पद वाटलं आणि कसून तपास केला असता घराच्या बाथरुममध्ये अपहरण करण्यात आलेल्या मुलाचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. वयोवृद्ध शिक्षकाचा नातू अरुण विश्वकर्मा (२०) यानंच अपहरण केलं होतं. त्यानंतर चिमुकल्याच्या दोन्ही ओठांवर फेविक्वीक लावून त्याचं तोंड बंद केलं आणि हात-पाय बांधून त्याला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं. त्यानंतर मारहाणीत चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
शिक्षकाचा नातू अरुण काहीच काम करत नव्हता. सट्टेबाजीत पैसा लावायचा. तसंच त्याला पबजी गेम खेळण्याचंही व्यसन होतं. आजी-आजोबांनी अनेकदा त्याला यातून बाहेर येण्यासाठी बजावलं. त्याला पैसेही देत नसत आणि त्याला नेहमी ओरडत असतं. याचाच राग घेऊन अरुण यानं आपल्या कुटुबीयांना धडा शिकवण्याचं ठरवलं आणि ६ वर्षीय मुलाचं अपहरण करुन त्याची हत्या केली. आरोपीनं तपासात पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी खंडणीसाठीची चिठ्ठी लिहून शेतात ठेवली होती. आरोपीचा आपल्या आजी-आजोबांना तुरुंगात पाठवण्याचा यामागचा हेतू होता.
धक्कादायक बाब अशी की अरुणनं केलेल्या कृत्याची त्याचे वडील राजकुमार आणि सून कुसूम यांना माहिती होती. पण त्यांनी प्रकरण दाबण्यासाठी आपल्या मुलाचा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणात ३०२, २०१, १२० ब आणि ३६४ अ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. तसंच मुख्य आरोपीला साथ देत गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहआरोपी आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे.