महिला पोलिसाला मोबाईल नंबर मागणाऱ्याला पब्लिक मार; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 10:36 AM2022-03-18T10:36:05+5:302022-03-18T11:13:55+5:30
Crime News : पब्लिक मार पडत असल्याने इतर पोलिसांनी त्याला रिक्षात बसविले, मात्र लोकांनी रिक्षातून ओढून पुन्हा त्याला चोप दिला.
जळगाव : नेरी नाका चौकात ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाकडे जाऊन दुसऱ्या एका महिला पोलिसाचा मोबाईल नंबर मागितला. यानंतर नंबर दिला नाही म्हणून पत्रकार सांगून भर चौकात गैरवर्तन करणाऱ्या सलीम खान अरमान खान पठाण (वय ५१,रा.पाळधी, ता.धरणगाव) याची पब्लिकनेच धुलाई केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडली. पोलिसांनीच त्याची लोकांच्या तावडीतून सुटका करत पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, त्याच्याविरुद्ध विनयभंग व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर वाहतूक शाखेच्या काही महिलांची नेरी नाका चौकात गुरुवारी ड्युटी होती. त्यापैकी एका महिला पोलीस अमलदाराजवळ सलीम खान आला व त्यांच्याकडे दुसऱ्या एका पोलिसाचा मोबाईल नंबर मागितला, त्यांनी माझ्याकडे त्यांचा क्रमांक नाही असे सांगितले असता सलीम खान हा वारंवार त्यांच्याकडे जाऊन मोबाईल नंबरची मागणी करून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत होता.
या महिलेने स्पष्ट शब्दात नकार दिल्यावरही तो त्यांच्या अंगावर धावून आला. घाबरलेल्या या महिला पोलिसाने शहर वाहतूक शाखेचे हजेरी मास्तर योगेश पाटील यांना त्याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ किरण मराठे, महिला पोलीस अमलदार सविता परदेशी, मदन पावरा, राहूल पाटील यांना मदतीसाठी रवाना केले.
स्थानिक पानटपरीचालक नितीन महाजन यांच्यासह इतर पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने या महिला पोलिसाचा हात धरुन ओढाताण करत मी पत्रकार आहे, असे सांगून मोबाईलमध्ये फोटो घेत ‘मी पत्रकार आहे, तुझी नोकरी घालवतो, तुझा साहेब मला सलाम करेल’ असा दम दिला. हा प्रकार पाहून जमलेल्या लोकांनी त्याला जागेवरच चोपले.
रिक्षातून काढून दिला चोप
पब्लिक मार पडत असल्याने इतर पोलिसांनी त्याला रिक्षात बसविले, मात्र लोकांनी रिक्षातून ओढून पुन्हा त्याला चोप दिला. कायदा कोणीही हातात घेऊ नका असे आवाहन करीत पोलिसांनी त्याला शनी पेठ पोलीस ठाण्यात आणले. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर या महिला पोलिसाने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला. त्याला लागलीच अटक करण्यात आली.