सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता लाच घेताना जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 07:53 PM2020-06-04T19:53:16+5:302020-06-04T19:56:04+5:30
रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी ३ लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून अडीच लाख रुपये स्वीकारताना अभियंता ताब्यात
पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्त्याच्या कामाचे ५० लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी ३ लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून अडीच लाख रुपये स्वीकारताना शाखा अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. लॉकडाऊनपूर्वी लाच मागितली गेली. त्याची तडताळणी केली गेली. त्यानंतर अचानक लॉकडाऊन सुरु झाल्याने दोघांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर ही कारवाई पूर्ण झाली आहे.विलास गोपाळराव तांभाहे (वय ५७, रा. शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक ४) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी एका कंत्राटदाराने तक्रार केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे जिल्ह्यातील रस्त्याचे काम मिळाले होते. त्यांनी हे काम पूर्ण केले होते. या पूर्ण केलेल्या कामाचे ५० लाख रुपयांचे बिल सही करुन मंजुरीकरीता पाठविण्यासाठी शाखा अभियंता विलास तांभाळे यांनी ३ लाख रुपये लाच मागितली होती. त्याची तक्रार मार्चमध्येच कंत्राटदाराने लाच लचुपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्याची १८ मार्च रोजी पडताळणी केली होती. त्यात त्यांनी ३ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे एकमेकांशी संपर्क झाला नाही. तसेच तांभाळे हे कार्यालयातयेत नव्हते व लॉकडाऊनमुळे कंत्राटदार कार्यालयात जाऊ शकत नव्हते. आतात्यांनी संपर्क साधल्यावर शाखा अभियंता तांभाळे यांनी लाचेची मागणी सुरुच ठेवली. त्यानंतर आता त्यांनी तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शविली. त्यानुसार गुरुवारी मालधक्का चौकाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्रमांक ४ च्या कार्यालयात सापळा लावण्यात आला.
कंत्राटदाराकडून अडीच लाख रुपये स्वीकारताना पकडण्यात आले.पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.