पुलगावच्या 'दिलीप'ला भोवला नर्सरीतील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, कोर्टाने ठोठावला दंडासह सश्रम कारावास
By महेश सायखेडे | Published: August 12, 2022 05:38 PM2022-08-12T17:38:01+5:302022-08-12T17:41:24+5:30
Crime News: नर्सरीचे शिक्षण घेणाऱ्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुलगाव येथील दिलीप काशीनाथ कोंटागळे (६१) यास दोषी ठरवून दंडासह पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
- महेश सायखेडे
वर्धा : नर्सरीचे शिक्षण घेणाऱ्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुलगाव येथील दिलीप काशीनाथ कोंटागळे (६१) यास दोषी ठरवून दंडासह पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही टी. सूर्यवंशी यांनी दिला.
दिलीप कोंटागळे याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १० नुसार पाच वर्षांचा सश्रम कारावास व चार हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पीडितेची आई रोजमजुरीच्या कामाला गेली असता आरोपीने पीडितेच्या घराजवळ येत अंगणात खेळत असलेल्या पीडितेला आपल्या ताब्यात घेत झोपडीत नेले. आरोपीहा पीडितेवर अत्याचाराच्या प्रयत्नात असतानाच रडत असलेल्या पीडितेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा आरोपीने त्या लोकांना शिवगाळ करीत घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेची आई घरी परतल्यावर संबंधित घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी त्यांना दिली. त्यानंतर पुलगांव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनीही तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतली. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक एहफाज मैनुद्दीन सैय्यद यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षा घेऊन न्यायाधिशांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.
पाच साक्षदारांची तपासली साक्ष
या प्रकरणी शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी न्यायालयात मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून सहा. फौजदार अनंत रिंगणे यांनी काम पाहिले. या प्रकरणी एकूण पाच साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली.