शॉकींग! एकतर्फी प्रेमातून 18 वर्षीय तरुणीवर केले अठरा वार; औरंगाबाद हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 06:07 AM2022-05-22T06:07:18+5:302022-05-22T06:13:51+5:30
दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. शरणसिंग अनेक दिवस कशीशचा पाठलाग करीत होता
औरंगाबाद : देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमातून तरुणाने २०० फूट ओढत नेऊन तिचा गळा चिरल्याची घटना शनिवारी महाविद्यालयाच्या परिसरातील रचनाकार कॉलनीत घडली. सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश प्रीतपालसिंग ग्रंथी (१८, रा. उस्मानुपरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शरणसिंग सेठी (२०, रा. भीमपुरा, उस्मानपुरा) असे आरोपीचे नाव आहे.
दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. शरणसिंग अनेक दिवस कशीशचा पाठलाग करीत होता. तिच्या कुटुंबीयांनीही समजावून सांगितले तरी तो ऐकत नव्हता. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कशीश मैत्रिणीसोबत महाविद्यालयात आली. शरणसिंगने तिथे तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. भेटण्याचा आग्रह धरला. दुपारी चनाकार कॉलनीजवळील एका कॉफीच्या दुकानात कशीश मैत्रिणीसोबत गेली. तेथे तो पाठलाग करीत आला. कशीश बाहेर येताच त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तो विकोपाला गेला. नंतर तो तिला २०० फूट अंतरावर असलेल्या रिकाम्या प्लॉटच्या दिशेने बळजबरीने ओढू लागला. सोबतच्या मैत्रिणीने आरडाओरडा केला. तोपर्यंत तो कशीशला प्लॉटवर घेऊन गेला. तेथे त्याने कशीशच्या मानेवर, पोटावर धारदार हत्याराने १८ वार केले. त्यानंतर शरणसिंग तेथून दुचाकीवर पळून गेला. मैत्रिणीने कशीशच्या भावाला फाेन करून ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. दोन्ही भाऊ घटनास्थळी आले. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. शरणसिंगच्या विरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
समजावले तरी...
वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते. शरणसिंग अनेक दिवसापासून कशीशचा पाठलाग करीत होता. तिच्या कुटुंबीयांनीही त्याला समजावून सांगितले होते, तरीही तो तिचा पिच्छा सोडत नव्हता.