पुलवामा हल्ला: मसूद अझहरसह १९ आरोपी; ‘एनआयए’ने दाखल केले १३,५०० पानी आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 03:13 AM2020-08-26T03:13:34+5:302020-08-26T03:13:53+5:30

एका स्थानिकासह एक पाकिस्तानी नागरिक राज्यातच लपून आहे

Pulwama attack: 19 accused including Masood Azhar; NIA files 13,500-page chargesheet | पुलवामा हल्ला: मसूद अझहरसह १९ आरोपी; ‘एनआयए’ने दाखल केले १३,५०० पानी आरोपपत्र

पुलवामा हल्ला: मसूद अझहरसह १९ आरोपी; ‘एनआयए’ने दाखल केले १३,५०० पानी आरोपपत्र

Next

जम्मू : काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे गेल्या वर्षी १४ फेबुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राष्ट्रीय तपासी यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी येथील विशेष न्यायालयात पाकिस्तान समर्थित ‘जैश-ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर, त्याचा धाकटा भाऊ अब्दुल रऊफ असगर यांच्यासह एकूण १९ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ४० जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने काही दिवसांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद््ध्वस्त केले होते व त्यावेळी दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांची जोरदार धुमश्चक्रीही झाली होती.

सहसंचालक अनिल शुक्ला यांच्या निगराणीखाली उपमहानिरीक्षक सोनिया नारंग आणि अधीक्षक राकेश बलवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘एनआयए’ पथकाने गेले सहा महिने तपास करून गोळा केलेल्या सज्जड पुराव्यांच्या आधारे हे सुमारे १३,५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले. त्यात ‘जैश-ए-मोहम्मद’ला हाताशी धरून पाकिस्तानने, तसेच त्यांच्या ‘आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेने हा भीषण हल्ला घडवून आणल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. अदिल अहमद धर नावाच्या एका स्थानिक युवकाने स्फोटकांनी भरलेली मोटार ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर आदळून हा आत्मघाती स्फोट घडवून आणला होता. मात्र, भारत सरकारच्या अत्याचाराबद्दल काश्मिरी जनतेच्या मनात असलेल्या रागातून हा हल्ला झाला, असे भासवण्यासाठी पाकिस्तानने मुद्दाम या स्थानिक युवकाचा आत्मघाती हल्लेखोर म्हणून वापर केला, असा ‘एनयआयए’चा दावा आहे. यासाठी मारल्या गेलेल्या व अटक केलेले आरोपी आणि ‘जैश’च्या म्होरक्यांमध्ये झालेली टेलिफोन संभाषणे व सोशल मीडियावरील चॅटचे पुरावे देण्यात आले आहेत.

याखेरीज गेल्या मार्चमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या विविध चकमकींमध्ये मारले गेलेले मोहम्मद उमर फारुख, कमरान आणि मुदस्सिर खान यांच्यासह एकूण सात मृत आरोपीही या हल्ल्याच्या कटात सामील होते, असे ‘एनआयए’चे म्हणणे आहे. तपासी यंत्रणेच्या म्हणण्यानुसार यापैकी उमर फारुख या पाकिस्तानी दहशतवाद्यास हल्ल्याच्या तयारीसाठी मुद्दाम तेथून पाठविण्यात आले होते, तर कमरान व मुदस्सीर खान हे दोघे ‘जैश’चे काश्मीरमधील स्थानिक ‘कमांडर’ होते. याशिवाय चार आरोपींचा फरार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यापैकी एक पाकिस्तानी व एक स्थानिक असून, ते अजूनही काश्मीरमध्येच असावेत, असा ‘एनआयए’चा कयास
आहे. 

जागेची केली टेहळणी
आरोपपत्रात अझहर मसूद व असगर यांचा मुख्य आरोपींमध्ये समावेश आहे. शाकीर बशीर मगरे, मोहम्मद अब्बास राठेर, मोहम्मद इक्बाल राठेर, वैझ-उ-इस्लाम, नन्शा जान, तारीक अहमद शहा आणि बिलाल अहमद कुचे या अटक केलेल्या आरोपींचाही त्यात समावेश आहे. या स्थानिक लोकांनी हल्ल्यापूर्र्वी जागेची टेहळणी करणे, हल्लेखोरांना आश्रय देणे व मदत करणे आणि हल्ल्याची आखणी करण्यात सहभागी होणे, असा त्यांच्यावर आरोप आहे.

व्यक्तिश: मसूद अझहरला व त्याच्या या संघटनेला ‘आयएसआय’च्या माध्यमातून सातत्याने मदत मिळत असते. हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यात पाकिस्तानचा हात असल्याचा इन्कार केला होता व कोण्या पाकिस्तानींच्या सहभागाचे पुरावे दिल्यास कारवाई करण्याच्या वल्गना केल्या होत्या; परंतु मसूद अझहर व ‘जैश’संबंधी पुरावे देऊनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले पाकिस्तानकडून उचलली गेली नाहीत.

2000 मध्ये अपहरण करून अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेण्यात आलेल्या एअर इंडियाच्या विमानातील १५५ प्रवाशांच्या सुखरूप सुटकेसाठी भारत सरकारने त्यावेळी भारतात कैदेत असलेल्या मसूद अझहरला सोडून दिले होते. त्याच अझहरने नंतर भारताविरुद्ध जिहादसाठी ‘जैश-ए-मोहम्मद’ची स्थापना केली.

Web Title: Pulwama attack: 19 accused including Masood Azhar; NIA files 13,500-page chargesheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.