उपायुक्ताकडे सापडली १ कोटी २८ लाखांची बेनामी संपत्ती; पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: July 13, 2023 08:39 PM2023-07-13T20:39:03+5:302023-07-13T20:39:21+5:30
याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य व तत्कालीन उपायुक्तावर उत्पन्नापेक्षा १ कोटी २८ लाख ९५ हजार १५० रुपयांहून अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. नितीन चंद्रकांत ढगे (वय ४१) आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा नितीन ढगे (वय ३५, रा. रहेजा गार्डन्स, वानवडी) यांच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन ढगे हा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा सदस्य असताना तक्रारदारच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यात तडजोड करुन २ लाख रुपये घेऊन वानवडीच्या घरी तक्रारदाराला बोलावले होते. १६ ऑक्टोबर २०२१ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना ढगे याला पकडले होते. या वेळी घेतलेल्या घरझडतीमध्ये १ कोटी २८ लाख ४९ हजार रुपयांची रोकड सापडली होती. तसेच जवळपास पावणे तीन कोटींची मालमत्ता आढळून आली होती.
नितीन ढगे याच्या मालमत्तेची २०२१ पासून उघड चौकशी सुरु होती. उघड चौकशीमध्ये ढगे हे १ कोटी २८ लाख ९५ हजार १५० रुपयांचा खुलासा करु शकले नाहीत. त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता ४७ टक्के अधिक आहे. त्यामुळे त्यांनी ही अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे निष्पन्न झाले. नितीन ढगे यांची पत्नी प्रतिभा ढगे यांनी अपप्रेरणा दिल्याने तसेच खोटी माहिती कागदपत्रांमध्ये भरुन वापरुन शासनाची फसवणूक केली. त्यामुळे नितीन ढगे व प्रतिभा ढगे यांच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर अधिक तपास करीत आहेत.