पुण्यातील व्यापाऱ्याची २ कोटींसाठी सातारा जिल्ह्यातील पाडेगावात गोळ्या घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 03:32 PM2020-01-05T15:32:52+5:302020-01-05T15:43:34+5:30
बहिणीने शनिवारी रात्री बंडगार्डन पोलिसांकडे बेपत्ता असल्याची फिर्याद दिली आहे.
पुणे/सातारा : पुणे येथील चप्पल व्यापाऱ्याचे अपहरण करुन २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सातारा जिल्ह्यातील लोणंदजवळील पाडेगाव येथे गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे.
चंदन कृपादास शेवानी (वय ४८, रा. पारमार पॅराडाईझ, साधु वासवानी, बंडगार्डन) असे त्यांचे नाव आहे. चंदन शेवानी यांचा खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील पाण्याच्या कॅनॉलजवळ शनिवारी रात्री आणून टाकला असल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यांच्या छातीत गोळी झाडण्यात आल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात २ सीआर नही दिये, इसके लिये गया, भाई के ऑर्डर पे ठोकणा पडा, असे लिहिले आहे.
याप्रकरणी त्यांच्या बहिणीने शनिवारी रात्री बंडगार्डन पोलिसांकडे बेपत्ता असल्याची फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी, शेवानी यांचा चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या कुटुंबियांनी शनिवारी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते घरीही नव्हते. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे हरविल्याची तक्रार दिली.
दरम्यान, सातारा पोलिसांना पाडेगाव येथे एका व्यक्तीचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला़. त्याच्या छातीत गोळ्या घालून खुन करण्यात आला होता. त्याची ओळख पटविण्यासाठी सातारा पोलिसांनी सर्वत्र त्याचे फोटो पाठविले. त्यातून बंडगार्डन पोलिसांकडे मिसिंग दाखल असलेल्या चंदन शेवानी यांचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.या घटनेनंतर पुणे पोलीस साताºयाकडे रवाना झाले आहेत. शेवानी यांच्या कुटुंबियांना खंडणीसाठी कोणाचाही फोन आला नसल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.