पाव दिला नाही, म्हणून तुफान राडा... दुकान फोडलं, मारहाण केली! चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: July 15, 2023 06:45 PM2023-07-15T18:45:49+5:302023-07-15T18:49:07+5:30
डोक्यात, हातावर आणि पाठीत लोखंडी रॉडने केला वार
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: भुर्जी पाव दिले नाही म्हणून दुकानाची तोडफोड करण्याची आणि मारहाण झाल्याची घटना पिंपरीत घडली. भाई असल्याचे सांगून चौघांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चौफुला चौक, भोसरी येथे गुरुवारी झाला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.
मेघराज वैजनाथ मंटाळे (वय ३२, रा. संत तुकाराम नगर, भोसरी, मूळ रा. हौदरुल, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. १४) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पिल्या उर्फ सुदर्शन राक्षे (वय २३), करण गुरुनाथ राठोड (वय २५), पत्या उर्फ प्रथमेश दिलीप कांबळे (वय २०, सर्व रा. भोसरी) आणि करण राठोड या मित्रांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंटाळे भोसरी येथील चौफुला चौकात भुर्जीचे दुकान लावतात. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आरोपी त्यांच्या दुकानावर आले. दोन भुर्जी आठ पाव दिले नाहीत, म्हणून करण राठोड याने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. तसेच, हातावर आणि पाठीत रॉडने मारहाण करून त्यांना जखमी केले.
फिर्यादीच्या दुकानातील कामगार परवीन यांच्या पोटात आरोपींनी लाथा मारल्या. त्यावेळी परवीन हिचे पती हुसेन हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता आरोपीने त्यांना देखील लाकडी बॅटने मारहाण केली. तसेच, राक्षे याने हुसेन यांच्या खिशातील आठ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. येथे धंदा करायचा असेल तर, आम्हाला पाहिजे ते लगेच द्यावेच लागेल, असे म्हणून आरोपींनी दुकानातील साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर करण राठोड आणि कांबळे यांनी हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तुला महित नाही का, मी भोसरीचा भाई आहे, आम्हाला जे पाहिजे असते ते लगेच द्यावे लागेल, नाही दिले तर मारून टाकीन, अशी धमकी आरोपींनी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.